तरुणांना विमानतळाशी संबंधित मिळणार रोजगार; दि. बा. पाटील जयंतीदिनी वाशीत महारोजगार मेळावा
By कमलाकर कांबळे | Published: January 3, 2024 07:27 PM2024-01-03T19:27:38+5:302024-01-03T19:28:38+5:30
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
नवी मुंबई: दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी, म्हणजेच येत्या १३ जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे याप्रसंगी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित रोजगार आणि व्यवसायविषयक मार्गदर्शन मेळावा सुद्धा होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीच्या सहयोगाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महारोजगार मेळाव्यामध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, ट्युटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्किंग, हॉस्पिटल्स, सेल्स ॲण्ड मार्केटिंग, हॉटेल इंडस्ट्री आदी विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती संजीव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्रालय म्हणजेच एमएसएमई, कौशल्य विकास मंत्रालय, सिडको महामंडळदेखील या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.
तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
यशस्वी मुलाखतीसाठी उमेदवारांना तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. करिअरविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्यात ज्यांना नोकऱ्या मिळणार आहेत, त्यांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला माजी महापौर जयवंत सुतार, जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधुरी सुतार, युवा नेते संकल्प नाईक, समाजसेवक विजय वाळुंज, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे दीपक पाटील आणि मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.