विमानतळाच्या जागेचा मोबदला नाही!
By Admin | Published: May 13, 2016 02:41 AM2016-05-13T02:41:30+5:302016-05-13T02:41:30+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने आधीच हस्तांतरित केली आहे. याशिवाय पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील
प्रशांत शेडगे, पनवेल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने आधीच हस्तांतरित केली आहे. याशिवाय पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील जमिनीचा सातबारासुध्दा सिडकोच्या नावावर झाला आहे. मात्र त्या बदल्यात पालिकेला अद्याप सिडकोने जमीन दिली नसून याबाबत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे जमीन तुम्ही घेतली, त्याचा पालिकेला मोबदला देणार कधी, असा सवाल लोकप्रतिनिधी विचारू लागले आहेत.
पनवेलजवळील १४ गावांजवळ २०५६ हेक्टर जागेवर विमानतळ उभारण्यात येणार असून सिडको आणि शासनाची जागा विमानतळाकरिता याआधीच वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतरही ४५० हेक्टर जागेचे संपादन करण्याचे काम बाकी होते. वाघिवली, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर, उलवे, वरचा ओवळे, वाघिवली पाडा, कोल्ही, कोपर आणि चिंचपाडा हे दहा पाडे बाधित होणार असून यामुळे ३ हजार कुटुंबे विस्थापित होणार आहे. सिडकोला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याकरिता नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोने डिसेंबर २०१० सालीच पुनर्वसन पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी संमतीपत्र भरून दिले आहेत. त्याचबरोबर कोपर येथे पनवेल नगरपालिकेने १९६० साली गटार योजनेकरिता ३२ एकर जागा संपादित केली होती. या ठिकाणी योजना काही प्रमाणात उभारण्यातही आली होती मात्र ती जास्त काळ चालू शकली नाही. त्यामुळे ही जमीन मिळावी याकरिता सिडको गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. सिडकोने या अगोदर पनवेल नगरपालिकेभोवती मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली. पालिकेची हद्द असलेले नवीनपनवेल, खांदा वसाहतही महामंडळाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पालिकेकडे आता जागाच शिल्लक राहिलेली नाही या कारणाने विकासकामे, योजना राबविण्याकरिता अडथळे निर्माण होत आहेत. पनवेल शहर त्याचबरोबर सिडकोच्या जागेत असलेल्या झोपडपट्ट्या हटविण्याकरिता त्याचे पुनर्वसन करणे क्र मप्राप्त आहे. याची पूर्णत: जबाबदारी पनवेल नगरपालिका घेत असून फक्त जागा सिडकोने द्यायची आहे. त्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. बायोमेट्रिक सर्व्हे करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे. मात्र सिडकोकडून अद्यापही जागा पालिकेकडे हस्तांतरित केली नाही. तक्का येथे भूखंड याकरिता सिडकोने फक्त देवू केला आहे, प्रत्यक्षात कृती शून्य आहे. या संदर्भात वारंवार बैठका झाल्या मात्र सिडकोकडून फक्त आश्वासनाची खैरात करण्यात आली. त्यामुळे कोपर येथे जागा देण्यास पालिकेने सातत्याने विरोध दर्शवला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश पारित करीत ही जागा विमानतळाकरिता देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. मात्र हा आदेश देत असताना त्या बदल्यात दुसरीकडे जमीन उपलब्ध करून देण्याचा उल्लेख होता. परंतु सिडकोने या आदेशाला हरताळ फासला असून चालढकलपणा सुरू आहे.