रुग्णवाढीमुळे धोक्याची घंटा; तुर्भे, काेपरखैरणेत स्थिती चिंताजनक, बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:18 AM2021-02-18T06:18:52+5:302021-02-18T06:19:14+5:30

CoronaVirus News : नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात  प्रशासनास यश आले होते. १ फेब्रुवारीला सक्रिय रुग्णांची संख्या ७९७ वर आली हाेती.

Alarm bells ringing; Turbhe, the situation in Kaeparkhaira is worrisome, on the rules in the market committee | रुग्णवाढीमुळे धोक्याची घंटा; तुर्भे, काेपरखैरणेत स्थिती चिंताजनक, बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर

रुग्णवाढीमुळे धोक्याची घंटा; तुर्भे, काेपरखैरणेत स्थिती चिंताजनक, बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर

Next

नवी मुंबई : रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. कोपरखैरणे, तुर्भे, बेलापूर व घणसोली विभागातील स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास प्रतिदिन १ लाखापेक्षा जास्त नागरिक भेट देत असून तेथे सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात येऊ लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात  प्रशासनास यश आले होते. १ फेब्रुवारीला सक्रिय रुग्णांची संख्या ७९७ वर आली हाेती. इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्रांचा परिसर कोरोनामुक्त झाला होता.  परंतु रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढू लागले व परिणामी रुग्णसंख्याही पुन्हा वाढू लागली आहे. पंधरा दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या १००ने वाढून ८९७ वर गेली आहे. शहरातील सर्वात गंभीर स्थिती बाजार समितीमध्ये आहे. येथील पाच मार्केटमध्ये प्रतिदिन जवळपास १ लाख नागरिक भेट देत आहेत.  भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कामगार, खरेदीदार व इतरांकडून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जात नाही. मास्कचाही वापर केला जात नाही. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कामगारांची वसाहत असलेल्या कोपरखैरणेमध्ये पंधरा दिवसात सर्वात जास्त रुग्ण वाढले आहेत. एपीएमसी मार्केट असलेल्या तुर्भे परिसरातही रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बेलापूर, घणसोलीमध्येही रुग्ण वाढले आहेत. 
कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी तातडीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियम तोडणारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

तीन विभागांत परिस्थिती आहे नियंत्रणात
फेब्रुवारी महिन्यात मनपा क्षेत्रातील पाच विभागात  रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. नेरुळ, ऐरोली, दिघा या तीन विभागात फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. ऐरोलीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १४९ वरुन ११९ वर आली आहे. नेरुळमध्ये १३७ वरून १२३ वर आली आहे. 

आयुक्तांनी बुधवारी दिलेले आदेश 
-कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
- कोरोना रुग्णाच्या संपर्कातील किमान २० नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे. 
- लग्न व इतर समारंभात नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात यावी. 
- नागरी आरोग्य केंद्रनिहाय डॉक्टरांचे व्हॉट्सॲप ग्रुप पुन्हा सक्रिय करणे. 
- मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई 
- कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवणे 
- आरटीपीसीआर व ॲँटिजेन चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे

Web Title: Alarm bells ringing; Turbhe, the situation in Kaeparkhaira is worrisome, on the rules in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.