नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्यामुळे नवी मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. फेब्रुवारी महिन्यातील १९ दिवसांमध्ये २१०९ रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ८०२ वरून १००३ वर पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिवाळी ते ३१ जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. परंतु १ फेब्रुवारीला रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली झाल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. एक महिन्यापूर्वी प्रतिदिन ४० ते ६० रुग्ण वाढत होते. सद्य:स्थितीमध्ये हे प्रमाण ८० ते १०० झाले आहे. एक महिन्यात शुक्रवारी प्रथमच एकाच दिवशी १०९ रुग्ण आढळले आहेत. रेल्वे सुरू झाल्यापासून मनपा क्षेत्रात तब्बल २१०९ रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. बेलापूर, तुर्भ, वाशी, कोपरखैरणे परिसरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच बाजारपेठांमध्ये नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. मास्कचा वापर केला जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही नागरिकांना विसर पडला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही रुग्णवाढीची गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईकरांसाठी पुन्हा धोक्याची घंटा, फेब्रुवारीत २१०९ रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:55 AM