दिघावासीयांना पुरवठा होणाऱ्या पाण्यात अळ्यांचे सत्र सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 04:22 AM2018-12-26T04:22:15+5:302018-12-26T04:23:00+5:30
दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात अळ्या आढळण्याचे सत्र सुरूच असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई : दिघा भागातील नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात अळ्या आढळण्याचे सत्र सुरूच असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आक्र मक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महापौर जयवंत सुतार यांनी कामाच्या मंजुरीसाठी महासभेची वाट न पाहता आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात जलवाहिनीची दुरुस्ती आणि गळतीसंदर्भात तातडीने कामे करून घ्यावीत असे आदेश दिले आहेत.
नवी मुंबई शहरातील पावणे ते दिघा भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येते, तसेच त्यानंतर दोन-तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दिघा भागात पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो त्या जलवाहिन्या अनेक ठिकाणी नादुरु स्त असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे नागरिकांना होणाºया पाणीपुरवठ्यात अळ्या आढळत आहेत. नगरसेवक नवीन गवते यांनी स्थायी समिती सभेत याबाबत आवाज उठविला होता, परंतु प्रशासनाने त्याबाबत गंभीर दखल न घेतल्याने अळ्या आढळण्याचे सत्र सुरू आहे.
सोमवारी झालेल्या महासभेत नगरसेविका अपर्णा गवते यांनी प्रशासनाला धारेवर धरत दिघावासीयांना अळ्यायुक्त पाणी पुरविण्यात येत असून नागरिकांनी पाणी कसे प्यायचे असा सवाल उपस्थित केला. झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रशासनाला काही सुख-दु:ख नसल्याचे सांगत कोणते काम तातडीने करावे याची काळजी प्रशासनाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी महापे ते दिघा जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा कमी काळात काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच जुन्या काही जलवाहिन्या नादुरु स्त असल्याने, तसेच लिकेज असल्याने समस्या उद्भवत असल्याचे सांगत पुढील महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महापौर सुतार यांनी सदरची कामे तातडीने करावीत असे आदेशित केले आहे.
२४ तास पाणीपुरवठ्याच्या घोषणा खोट्या?
दिघा भागात पाण्यात अळ्या आढळत असल्याने याविषयावर सभागृहात चर्चा होत असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक निवृत्ती जगताप यांनी घणसोली ते दिघा भागात मोरबे धरणातून कधी पाणीपुरवठा होणार आहे असा सवाल करीत गावठाण आणि झोपडपट्टी भागात पाणी मिळत नसून २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याच्या घोषणा खोट्या असल्याचा आरोप केला.