ऑलकार्गो कामगारांचा आत्मदहनाचा इशारा, उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 02:54 AM2019-08-02T02:54:58+5:302019-08-02T02:55:01+5:30
कामावरून केले कमी : उपासमारीची वेळ
उरण : तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो गोदाम कंपनीने २१ कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता गुरुवारी कामावरून काढून टाकले. या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून संतप्त कामगारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदनही देण्यात आले आहे.
आॅलकार्गो गोदामात सुरुवातीपासून हे कामगार काम करीत आहेत. प्रकल्पासाठी त्यांनी अत्यल्प दराने देऊ केल्या असून कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आले असताना गुरुवारी अचानक कामावरून काढून टाकल्याचे व कामगारांच्या बँक खात्यावर नोकरीतील रक्कम आर्टिजीएसद्वारे सक्तीने टाकण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कंपनीत प्रवेशद्वाराजवळ कामावर येण्यास मज्जाव केलेल्या कामगारांच्या नावाची यादी लावण्यात आली आहे. सर्व कामगार वय ४० ते ४५ वयोगटातील असून आता दुसरीकडे रोजगार मिळले की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे. कुटुंबावर उपासमारीचे वेळ आल्याने सामुदायिक आत्मदहनाचा इशारा कामागारांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या प्रकरणी आॅलकार्गो गोदाम कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारीच हे जबाबदार राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आॅलकार्गो गोदाम कंपनीने २७ जून २०१७ मध्ये सुमारे १३१ कामगारांना कमी केले. याबाबत जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. त्याचप्रमाणे २१ कामगारांनाही गुरुवारी गोदामात प्रवेश करण्याचा मज्जाव करण्यात आला. कामगारांनी आक्रमक भूमिका घेऊ नये यासाठी व्यवस्थापनाने प्रवेशद्वारासमोर मोठा पोलीस ताफा तैनात केला आहे.