दारूविक्रीची दुकाने होणार पुन्हा सुरू, पनवेलमध्ये जवळपास १०० दुकाने : महापालिका, नगरपंचायत क्षेत्र वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:23 AM2017-09-08T03:23:27+5:302017-09-08T03:23:31+5:30
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गावरील हजारो बार काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते.
पनवेल : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गावरील हजारो बार काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. पनवेल शहरात देखील शेकडो बार, बीयर शॉपी, वाइन शॉप या निर्णयामुळे बंद झाले होते. काहींनी तर आपली दुकाने इतरत्र सुरू केली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील महामार्गावर दारूबंदी लागू होणार नसल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील शेकडो बार पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. दारूबंदी उठल्याने दुकानदार, तसेच मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बार, शॉप हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पनवेल परिसरातील १०० हून अधिक परवाने रद्द करण्यात आले होते. मात्र या निर्णयात आता पुन्हा बदल करण्यात आल्याने बंद झालेले महानगरपालिका क्षेत्रातील वाइन बार, शॉप पुन्हा सुरू होणार आहे.
राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५०० मीटर क्षेत्रात असलेल्या वाइन बार, वाइन शॉप, बीअर शॉपी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन बार, शॉप, देशी दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पनवेलमधील अनेक वाइन बार, शॉप, बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने बंद झाली, तर काहींनी राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर क्षेत्राबाहेर ही दुकाने हलविली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लिकर लॉबीला दिलासा मिळाला असून महापालिका क्षेत्रातील जवळपास ११0 वाइन बार, शॉप, बीअर शॉपी सुरू होणार आहेत.