नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात मद्यपींचा वावर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:08 AM2020-08-03T00:08:57+5:302020-08-03T00:10:03+5:30
महापालिका, पोलिसांचे दुर्लक्ष: तंबाखू, गुटख्याची खुलेआम विक्री
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची वर्दळ नसल्याने स्थानकाच्या बाहेरील परिसरात बेघर, निराश्रित नागरिक वास्तव्य करीत असून, स्थानकाच्या आवारात मद्यपींनी मुक्काम ठोकला आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील वॉश बेसिनची दुरवस्था झाली असून, या परिसरात तंबाखू, गुटख्याची खुलेआम विक्री केली जात आहे. याकडे महापालिका, पोलीस आणि सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे.
नवी मुंबईत रेल्वे स्थानकांवर नागरिकांची वर्दळ नाही.पावसामुळे अनेक बेघर, निराश्रित नागरिक नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरील बाजूस वास्तव्य करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर प्रवाशांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन बसविण्यात आले होते, परंतु या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने वॉश बेसिनचे नळ चोरीला गेले असून, दुरवस्था झाली आहे.रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला तिकीट घराजवळील परिसरात मद्यपी मुक्काम करीत असून, परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्याप पानटपरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, परंतु रेल्वे स्थानक परिसरात खुलेआम तंबाखू, सिगारेट, गुटख्याची विक्री केली
जात आहे.
सामाजिक अंतराचा विसर
नागरिक खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असून, मास्क, सामाजिक अंतर यांसारख्या नियमांचे पालनही केले जात नाही. या प्रकाराकडे
महापालिका प्रशासन, पोलीस आणि सिडको दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.