नवी मुंबई : शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठीच्या ‘भारत बंद’मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, माथाडी कामगार व वाहतूकदारही सहभागी झाले हाेते. पाचही मार्केट पूर्णपणे बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारने नवीन कृषी व कामगार कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला, फळ, कांदा, मसाला व धान्य मार्केटमधील सर्व व्यापारी संघटना, माथाडी कामगार व वाहतूूकदारांच्या सर्व संघटनांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनच्या वतीने माथाडी भवनसमोर छोटी सभा घेऊन केंद्र सरकारच्या कायद्यांना विरोध दर्शविला. यावेळी माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, एकनाथ जाधव व इतर कामगार नेते उपस्थित होते. बंदमुळे दिवसभरात बाजारसमितीमधील २५ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. बंदमुळे व्यापाऱ्यांनी माल मागविला नव्हता. बाजार समितीसह बाहेरील वाहतूकदारही मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले होते. यामुळे ट्रक टर्मिनलसह रोडवरही ट्रक उभे केले होते.तर, पनवेलसह नवी मुंबईमधील शीख बांधवांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन मोटारसायकल व कार रॅलीचे आयोजन केले होते. नरिमन पॉइंट येथे जाण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी मानखुर्दजवळ रोखले. आंदोलकांनी काही वेळ महामार्ग रोखला. नवी मुंबई, पनवेलमधील गुरूद्वारा असोसिएशन, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशननेही सहभाग घेतला होता. नरिमन पॉइंट येथे होणाऱ्या मानवी साखळीत सहभागी होण्यासाठी शीख नागरिक मोटारसायकल व कार घेऊन निघाले होते. पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलक मुंबईकडे निघाले. मुंबई पोलिसांनी त्यांना मानखुर्दजवळील पूर्वीच्या जकात नाक्याजवळ थांबविले. १४ डिसेंबरला पुन्हा बंदकेंद्र सरकारच्या नवीन कायद्यविरोधात माथाडी कामगारांनी ८ डिसेंबरच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. १४ डिसेंबरला राज्याशी संबंधित माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांनी त्या संपातही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारचे नवीन कायदे भांडवलदारांना पायघड्या घालणार आहेत. बाजार समिती उद्ध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी बाजार समितीमधील कामगार, व्यापारी आंदोलनात सहभागी झाले होते.-आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आंदोलनात सर्व कामगार सहभागी झाले होते. राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.- नरेंद्र पाटील, माथाडी नेते
वाशी टोल नाक्यावर मानवी साखळीनवी मुंबई : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुप्रीम कौन्सिल गुरुद्वारा नवी मुंबई आणि पंजाबी असोसिएशनच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला. मंगळवारी वाशी टोल नाक्यावर मानवी साखळी तयार करून ‘शेतकरी बचाव’च्या घोषणा देण्यात आल्या.शासनाने बदल केलेले विधेयक रद्द करावे आणि शेतकऱ्यांना वाचवावे, अशा घोषणा देत टोल नाक्यावरून पनवेलच्या दिशेने मानवी साखळी तयार करण्यात आली होती. आंदोलकांनी विविध फलक हातात धरून केंद्र शासनाचा निषेध केला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या आंदोलानाला मेहेरसिंग रांधवा, अमरजितसिंग सैनी, जसवंदर सिंग आदी नवी मुंबईतील गुरुद्वाराचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाशीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन नवी मुंबई : केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा, यासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मंगळवारी, ८ डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यानुषंगाने ‘भारत बंद’ला पाठिंबा देत, नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्याचा निषेध करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कायद्यात केलेल्या बदलाविरोधात दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत. मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला नवी मुंबईत पाठिंबा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने बदल केलेल्या कृषी कायद्याविरोधात नाराजी व्यक्त करीत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला, तसेच घोषणाबाजी करण्यात आली.
नेरुळमध्ये काँग्रेसने केले आंदोलनकेंद्र सरकारने सभागृहात मंजूर केलेल्या या कायद्याविरोधात नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरुळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ सेक्टर २ येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची प्रत जाळण्यात आली.