व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:20 AM2020-02-01T00:20:45+5:302020-02-01T00:20:55+5:30
जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी मेहुल गिरीष भानुशाली, कुणाल विनायक बाविस्कर, गणेश मोहन मस्तुद व अरविंद साहेबराव काशीद यांचा समावेश आहे.
नवी मुंबई : शासनाच्या परवानग्या न घेता, आठ कंपन्या स्थापन करून गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या टोळीतील चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी मेहुल गिरीष भानुशाली, कुणाल विनायक बाविस्कर, गणेश मोहन मस्तुद व अरविंद साहेबराव काशीद यांचा समावेश आहे. या चौघांनी ग्लोबल ड्रेडिंग, बी.एस. वाय. मार्केटिंग, बिलिव्ह युवर सेल मल्टिट्रेड, रॉयल पे, पीजीएमईन, माय डीएस बी असोसिएट्स, एस. एम. वर्ल्ड, ग्रोथ इंडिया या कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून प्रतिदिन दोन टक्के दराने १०० दिवस परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्यास सुरुवात केली होती. वाशी सेक्टर १९ मधील सारंग हेरिटेज लॉज, अॅम्बियन्स कोर्ट येथे कंपनीचे काही जण पैसे स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनी व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही परवानग्या घेतल्या नव्हत्या. वाशीमधील एक महिलेने या कंपन्यांमध्ये पाच लाख ९० हजार रुपये गुंतविले होते; परंतु प्रत्यक्षात व्याजाची रक्कम दिलेली नाही. इतरांनाही अशाच प्रकारे आमिष दाखविले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपासात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई, अतुल लांबे, संदीप सहाणे, संतोष शेटे, सदानंद सोनकांबळे, राजेश सलगर, ताराचंद पाटील, सचिन पाटील,
संदीप चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, पुढील तपास सुरू केला आहे.