नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता. भाजीपाला व्यापारी महासंघानेही 31 मार्च पर्यंत बंद चा निर्णय घेतला होता. परंतु यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता होती. शासनाने आवाहन केल्यानंतर व्यापारी, कामगार व प्रशासनाने मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी बाजार समिती मध्ये झालेल्या बैठकीला माजी मंत्री शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, पणन संचालक सुनील पवार, एपीएमसी संचालक अनिल चव्हाण उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुंबई व नवी मुंबई मध्ये धान्य, भाजीपाला तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक मार्केट निहाय एक कमीटी तयार करण्यात येणार आहे. मार्केट मध्ये सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास एक मार्केट सुरू व दुसरे बंद असा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु कोणत्याही स्थितीत मुंबई चा धान्य व भाजीपाला पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जाणार आहे. तुर्त तरी मुंबई करांना दिलासा मिळाला असून पाडव्यानंतर सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत
मुंबईसह नवी मुंबईकरांसाठी खूशखबर; कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व मार्केट सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:38 PM