पनवेल: सिडकोमार्फत राबविण्यात येणारा नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी तसेच पनवेल उरण नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बांधलेली रहिवासी, वाणिज्य वापरातील बांधकामे जेथे आहेत तेथे नियमित करावी, विरार अलिबाग कॉरिडॉर, लॉजिस्टि्स पार्क, महाऊर्जा प्रकल्प आदी प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यासाठी 95 गाव नवी मुंबई, नैना प्रकल्पग्रस्त समितीच्या शिष्टमंडळाने सोमवापी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकुर,राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील,शिवकरचे माजी सरपंच अनिल ढवळे,माजी नगरसेवक रवींद भगत, ॲड मदन गोवारी,अतुल म्हात्रे,सुधाकर लाड आदी या शिष्टमंडळात उपस्थित होते.यावेळी पनवेल उरण मधील विविध प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी नैना प्रकल्प, गरजेपोटी घरे नियमित करणे व इतर मागण्या संदर्भात लवकरच मुख्यमत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.
पनवेलमध्ये 6 डिसेंबर रोजी नैना प्रकल्प हद्दपार करण्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु होत आहे. शिवकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने हे उपोषण होत आहे. यासंदर्भात नैना प्रकल्पग्रस्तांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे. एकीकडे सिडकोने नैना क्षेत्रात कामांना सुरुवात केली असताना प्रकल्पग्रस्त नैना प्रकल्पाविरोधात आपला रोष व्यक्त करत आहेत.