सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची माेर्चेबांधणी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क कार्यालय उद्घाटनांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:55 AM2021-02-09T01:55:34+5:302021-02-09T01:55:50+5:30
कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पाच वर्षे बंद असलेली जनसंपर्क कार्यालये पुन्हा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वार्डमध्ये तीन ते चार नवीन कार्यालये सुरू होऊ लागली आहेत. हळदी-कुंकू समारंभ व सहलींचे प्रमाणही वाढले आहे.
कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकांच्या हालचाली सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनीही माेर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे. नगरसेवक व इतर अनेक कार्यकर्त्यांची कार्यालये पाच वर्षे नेहमी सुरूच असतात. परंतु निवडणूक लढण्याची इच्छा असणारे अनेक कार्यकर्ते फक्त निवडणुका जवळ आल्या की कार्यालये सुरू करतात व निवडणुका संपल्या की पुन्हा बंद करीत असतात. यावेळीही नवीन कार्यालय सुरू करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. काही प्रभागांमध्ये पाच ते सहा इच्छुकांची कार्यालये उभी राहिली आहेत. जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनांसाठी पक्षाच्या नेत्यांची उपस्थितीही वाढू लागली असून, एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनांसोबतच हळदी-कुंकू समारंभांची संख्याही वाढली आहे. निवडणुकीसाठी महिलांची मते निर्णायक ठरत असतात. ही मते आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केली जात आहेत. मतदारांना देवदर्शन व पर्यटन स्थळांवर सहलीसाठी घेऊन जाण्याचीही स्पर्धा सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हरलेल्या अनेकांनी कार्यालये बंद केली होती. त्यापैकी अनेकांनी पुन्हा कार्यालये सुरू केली आहेत. हंगामी कार्यालय सुरू करण्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पाच वर्षे नियमित कार्यालय सुरू ठेवणाऱ्यांनीही प्रचारामध्ये या मुद्याकडे मतदारांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.
आघाडीचे नाईकांवर टीकास्त्र
महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही नवी मुंबईमध्ये नवीन कार्यालयांची उद्घाटने व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व आ. शशिकांत शिंदे यांनी भाजप आ. गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाईक यांना सर्व काही दिले. आमदार, खासदार, मंत्री, महापौर सर्व पदे एकाच घरात दिली. फक्त मुंबईतील सिल्वर ओकचे घर व काटेवाडीची घर सोडून सर्व काही दिले, तर नाईकांनी धोका दिल्याची टीका आव्हाड यांनी सीवूडमध्ये केली.
नाईकांचे विकासावर बोलण्याचे आव्हान
भाजप आमदार गणेश नाईक यांनीही विरोधकांवर आक्रमकपणे टीका करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईच्या जनतेने आमच्यावर नेहमीच विश्वास दाखविला व आम्ही शहराचा विकास करून तो विश्वास सार्थ ठरविला. तुर्भे येथे झालेल्या कार्यक्रमात पक्ष सोडून गेलेल्यांवरही टीका केली.