नामदेव मोरेनवी मुंबई : उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोचा देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वच राज्यांमधील होलसेल मार्केटमध्ये ३० ते १५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत असून, किरकोळ मार्केटमध्ये १८० चा टप्पा ओलांडला असून, पुढील दोन आठवडे तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील व देशभरातील टोमॅटो शेतकऱ्यांना जानेवारी ते मेदरम्यान भाव मिळत नसल्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. सहा महिने ५ ते १८ रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करावी लागली होती. अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढीही रक्कम मिळाली नव्हती. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे व नंतर सलग पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वत्र उत्पादन कमी झाले असून, टोमॅटोला चांगला भाव मिळू लागला आहे.
राज्यात विविध बाजार समित्यांमध्ये ३० ते १२० रुपये भाव मिळत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ४० ते ९० रुपये दराने विक्री झाली. देशातील सर्वच प्रमुख राज्यांमधील होलसेल मार्केटमध्ये टाेमॅटो १५० रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत. जम्मू काश्मीर, नागालँड व पश्चिम बंगालमध्ये भाव १५० रुपयांवर गेला आहे. इतर सर्वच राज्यांमध्येही टोमॅटोने शंभरी ओलांडली आहे. मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये सरासरी १८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. या दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढलेल्या बाजारभावामुळे ग्राहकांनी टोमॅटोचा वापर कमी केला आहे.