नवी मुंबई : माथाडी कामगारांनी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक बंद मागे घेण्यात आला आहे. यामुळे १४ डिसेंबरला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट सुरू राहणार आहेत. बंद गृहीत धरून अनेक व्यापाऱ्यांनी माल मागविला नव्हता. यामुळे गुरूवारी पाचही मार्केटमध्ये आवक कमी होण्याची शक्यता आहे. शासनाने माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा निर्णय घेतला होता. या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व प्रमुख माथाडी कामगार संघटनांनी राज्यव्यापी बंदची घोषणा केली होती. परंतु बुधवारी नागपूर येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून कामगार संघटनांच्या प्रतिनिधींच्या सुचनांचा विचार करून योग्य कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. या बैठकीला माथाडी नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह इतन कामगार नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गुरूवारी कांदा बटाटा, फळे, भाजीपाला, मसाला व धान्य मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी संघटनांनीही मार्केट सुरू राहणार असल्यामुळे कृषी माल पाठविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. कामगारांनी बंदची घोषणा केली असल्यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी कृषी माल मागविला नव्हता. अचानक बंद मागे घेतल्यामुळे माल मागविण्याची तारांबळ सुरू झाली होती. प्रत्यक्षात आवक किती आवक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.