सर्व व्यवसाय असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या छताखाली, ३४० क्षेत्रांतील कामगारांना राज्य शासनाचे कवच
By नारायण जाधव | Published: July 10, 2023 04:08 PM2023-07-10T16:08:13+5:302023-07-10T16:09:25+5:30
या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.
नवी मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह सर्वच क्षेत्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे योगदान मोठे आहे. अशा कामगारांचे ३८ घटकांतील वर्गीकरण एकूण ३४० क्षेत्रांतील कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेती, उद्योग, फेरीवाले, आयटी इंडस्ट्रिजसह, प्रिंट आणि टीव्ही, डिजिटल क्षेत्रातील पत्रकार, तत्सम कर्मचारी, कॉल सेंटर, मॉल, लॉ फर्म, शिक्षण संस्थांमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्व ३४० क्षेत्रांतील कामगारांना आता महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाचे कवच लाभणार आहे.
केंद्र सरकारने असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या डिसेंबर २००८ मध्ये असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम मंजूर केला आहे. त्यानुसार लेबर ब्युरो, चंडीगड यांनी २०१४ मध्ये केलेल्या चौथ्या वार्षिक रोजगार-बेरोजगार सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात ३,६५,२५,१४० असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम २०१३ अन्वये ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ’ स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल तयार केले असून त्यावर ३१ मे २०२३ अखेर राज्यात सुमारे १३६.२८ लाख असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे. हे कामगार कृषी, उद्योग, सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
मिळणार सरकारी योजनांचा लाभ
राज्यातील असंघटित क्षेत्रातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संघटना तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने असंघटित कामगारांच्या व्यवसायाच्या वर्गीकरणानुसार कामगारांच्या कल्याणाकरिता कल्याण मंडळे स्थापन करण्याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु, अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळे स्थापन करण्याऐवजी सर्वसमावेक्षक एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देता योग्य होईल, असा निष्कर्ष शासनाने काढला आहे.
या ३९ क्षेत्रांतील कामगारांचा समावेश
नव्या असंघटित कामगार कल्याण महामंडळाच्या कार्यक्षेत्रात कृषी, पशुपालन, डेअरी, घरकामगार, बिडी उद्योेग, रिक्षा-टॅक्सीचालक, हमाल, बूट पॉलिश, कपडा, पॉवरलूम, पत्रकारितेतील छापील, टीव्ही, डिजिटल माध्यम, हॉटेल उद्योग, बँकिंग क्षेत्र, ब्युटी पार्लर, सिनेमा उद्योग, बांधकाम उद्योग, शिक्षण संस्था, जाहिरात, मॉडेलिंग, लेखक, कवी, सर्व अन्नप्रक्रिया उद्योग, तेंदूपत्ता कामगार, आशा, अंगणवाडी वर्कर, काॅल सेंटर, मॉल, सर्व प्रकारच्या उत्पादन क्षेत्रातील कामगार, दवाखाने, हॉस्पिटल, फार्मा उद्याेग, वकील, ज्योतिष, इंजिनीअर, प्रॉपर्टी डिलरसह इतर व्यावसायिक, थिएटर उद्योग, वाहतूक उद्योग, पर्यटन क्षेत्र आणि स्वयंरोजगार अशा ३४० क्षेत्रांचा समावेश आहे.