आरोग्य सेवेच्या हस्तांतरणाला विरोधी पक्षाचा विरोध, सिडको पालिकेवर दबाव टाकत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:12 AM2017-09-28T04:12:07+5:302017-09-28T04:12:10+5:30

महानगर पालिका व सिडको यांच्यात सुरू असलेल्या हस्तांतरणाचा विषय सध्या चांगलाच गाजला आहे. १ आॅक्टोबरपासून सिडकोने आरोग्य सेवा पालिकेकडे हस्तातंरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 The allegation against opposition party's opposition to the transfer of health services is being pressured by CIDCO | आरोग्य सेवेच्या हस्तांतरणाला विरोधी पक्षाचा विरोध, सिडको पालिकेवर दबाव टाकत असल्याचा आरोप

आरोग्य सेवेच्या हस्तांतरणाला विरोधी पक्षाचा विरोध, सिडको पालिकेवर दबाव टाकत असल्याचा आरोप

Next

पनवेल : महानगर पालिका व सिडको यांच्यात सुरू असलेल्या हस्तांतरणाचा विषय सध्या चांगलाच गाजला आहे. १ आॅक्टोबरपासून सिडकोने आरोग्य सेवा पालिकेकडे हस्तातंरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने स्थापन केलेल्या समितीने सिडकोच्या या निर्णयाला विरोध दर्शविला असून सद्यस्थितीला आरोग्य सेवा हस्तांतरित करून नये अशी विनंती सिडकोकडे केली आहे. मात्र सिडकोने यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नसल्याने शेकाप महाआघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी मार्केट यार्डमधील सभागृहात पत्रकार परिषद घेऊन हस्तांतरणाला विरोध दर्शविला.
या पत्रकार परिषदेला शेकापचे गटनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक अरविंद म्हात्रे, हरेश केणी, सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र भगत, शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेवा हस्तांतरणानंतर कशाप्रकारे पालिकेवर विविध बाबींसह आर्थिक बोजा पडणार आहे याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. नवी मुंबई महानगर पालिकेच्या स्थापनेनंतर साधारणपणे ६ ते १० वर्षांत टप्प्याटप्प्याने आरोग्य सेवेसह विविध सेवा हस्तांतरित करण्यात आल्या. आरोग्य सेवा हस्तांतरित झाल्यास सुमारे ५० कोटींचा बोजा पालिकेवर पडणार आहे. यावेळी तळोजा डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केला. ते डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यास पालिकेने कचरा कुठे टाकायचा? असा प्रश्न उपस्थित करीत सिडकोने पालिकेसोबत यासंदर्भात एक सर्व्हे करावा त्यानंतर यासंदर्भात निर्णय घ्यावा असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. पनवेल महानगर पालिकेसमोर देखील अनेक प्रश्न असताना पालिकेवर अशाप्रकारे बळजबरीने हस्तांतरणाचा बोजा टाकल्यास पालिकेला ते परवडणारे नसल्याचे गटनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापन पालिकेला झेपणार नसल्याने सिडकोनेच हा कचरा उचलायला हवा असे स्पष्ट केले. एकीकडे पनवेल महानगरपालिकेला आरोग्य सेवा हस्तांतरणाची घाई करीत आहेत तर आरक्षित असलेले भूखंड, मैदाने, उद्याने हे सिडको पालिकेला का देत नाही असा प्रश्न गणेश कडू यांनी उपस्थित केला .
पनवेल महानगर पालिका ग्रामीण भागात मोठ्या समस्या आहेत. तळोजा डम्पिंग ग्राउंडमुळे तेथील गावांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.तेथील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याची समस्या आहे, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज याकरिता सिडकोने पालिकेसोबत समन्वयाने सर्व्हे करूनच या आरोग्याच्या प्रश्नावर निर्णय घ्यावा, असे अरविंद म्हात्रे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेतेपदी अद्याप शेकापने कोणाची घोषणा केली नसल्याने यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. मागील सभेत सभात्याग केल्यामुळे ही निवड लांबणीवरच पडली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते पदावरून पक्षात कोणताच
वाद नसल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

पनवेल हागणदारीमुक्त नाही
पनवेल महानगर पालिका हागणदारीमुक्त झाली असल्याचे पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. याकरिता स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत राज्य शासनाच्या समितीने देखील पनवेलची पाहणी केली होती. मात्र पनवेल महानगर पालिकेला आम्ही हागणदारीमुक्त पालिका असल्याचे मानत नसल्याचे शेकाप गटनेते प्रीतम म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

Web Title:  The allegation against opposition party's opposition to the transfer of health services is being pressured by CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.