पालिकेच्या आरक्षण सोडतीवर पक्षपातीपणाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 02:24 AM2021-02-13T02:24:22+5:302021-02-13T02:24:34+5:30
अधिकाऱ्यांवर संगनमताचा ठपका; सेना पदाधिकारी न्यायालयात
नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेले प्रभागांचे आरक्षण पक्षपातीपणे केल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी आयुक्तांसह निवडणूक विभागाचीही दिशाभूल केली असून, राजकीय दबावाखाली सोडत काढली असल्याचा आरोप केला आहे. या सोडतीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २०२० मध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे १ फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणाविषयी अनेक नगरसेवकांनी आक्षेप घेतले होते. शिवसेना नगरसेवक एम.के. मढवी व विनया मढवी यांनी न्यायालयात धाव घेतली होती; परंतु यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. निवडणूक विभागाने पुन्हा निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरु केली असून, १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदान यादी जाहीर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मढवी दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन आरक्षण सोडतीवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. एम.के. मढवी यांनी सांगितले की, तत्कालीन उपआयुक्तांनी ठरावीक राजकीय पक्षाला लाभ मिळेल, अशा पद्धतीने प्रभागांचे आरक्षण काढले आहे. महानगरपालिकेमध्ये अभ्यासपूर्ण बोलणाऱ्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित केले आहेत. आरक्षणासाठी वापरण्यात आलेली पद्धत चुकीची आहे. मनपाची सहावी निवडणूक असताना ती चौथी असल्याचे भासविण्यात आले. २००५ च्या धर्तीवर आरक्षण ठरविण्यात आले.
आरक्षण प्रक्रियेत असलेल्या उपआयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी संगनमताने ठरावीक राजकीय पक्षाला लाभ मिळूवन देण्यासाठी काम केल्याचा आरोपही केला. आयुक्त व निवडणूक विभागाचीही दिशाभूल केली आहे. आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारूप मतदान याद्या जाहीर करण्याची तारीख जवळ आली असताना आरक्षणावर आक्षेप घेतल्यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेसाठीचे प्रभाग आरक्षण
सर्वसाधारण प्रभाग : १, ६, १३, १५, २४, ३४, ३६, ३७, ३८, ३९, ४४, ४५, ४७, ५१, ५२, ५३, ५६, ६२, ६३, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७६, ७८, ७९, ८०, ८५, ८७, ८८, ९०, ९४, ९६
सर्वसाधारण महिला : ४, ५, ११, १४, १८, २२, २३, २६, २८, २९, ४०, ४२, ४६, ४९, ५०, ५५, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६७, ६८, ७४, ७५, ८४, ८९, ९२, ९३, ९५, ९७, १०३, १०७, १०९, ११०
ओबीसी : २, ३३, ३५, ४१, ४३, ५४, ६४, ६५, ६६, ७७, ८३, ८६, ९१, ९८, ९९
ओबीसी महिला : ७,८,९,१२,१९, २०, २१, २७, ८१, ८२, १००, १०२, १०४, १०५, १११
अनुसूचित जाती महिला प्रवर्ग : १६, ३०, ३२, १०६, १०८
अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग : २५
अनुसूचित जाती प्रवर्ग : ३, १०, १७, ४८, १०१
अनुसूचित जमाती पुरूष प्रवर्ग : ३१
महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करताना अनेक उणिवा राहिलेल्या आहेत. पक्षपातीपणे आरक्षण ठरविण्यात आले असून, या सोडतीला आम्ही न्यायालयात आव्हान दिले आहे.
- एम. के. मढवी,
माजी नगरसेवक शिवसेना
काय होणार याविषयी उत्सुकता
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीला आव्हान दिल्यामुळे आता मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण होणार, का निवडणुका एप्रिलमध्ये होणार, की पुढे ढकलण्यात येणार याविषयी उत्सुकता लागली आहे.