नवी मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आरक्षणाचाही प्रश्न निकाली काढणे आवश्यक होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘मुंबई भूषण’ या पुरस्कार सोहळ्याच्या वितरण प्रसंगी ते नेरुळमध्ये उपस्थित होते.प्रतिवर्षी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविले जाते. त्यानुसार यंदाचा तिसरा पुरस्कार सोहळा नेरुळमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विधान परिषद सदस्य रामहरी रुपनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी विद्यमान सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. टिसचा अहवाल तयार असतानाही तो सभागृहात मांडला जात नाही, यावरून सरकारच्या नियतीत खोट दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. तर धनगर समाजाने आरक्षणाची लढाई सर्व नेते, संघटना व संस्था यांना एकत्रित घेवून लढायची असल्याचे म्हणत विधान परिषद सदस्य रामहरी रुपनवर यांनी संघटित होण्याचे आवाहन केले.धनगर समाजाच्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून इतरांनाही प्रोत्साहित करण्यासाठी आयोजक धनंजय तानले यांच्या वतीने ‘मुंबई भूषण’ पुरस्कार दिला जातो. त्यानुसार यंदाचा हा पुरस्कार क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, मुंबई महापालिकेचे अभियंता अशोक यमगर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज माने, राष्टÑपती पुरस्कार प्राप्त गणपत पिंगळे, अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर दामोदर, नगरसेवक अशोक गुरखे, सहायक पोलीस आयुक्त काशिनाथ कचरे, शिक्षण संस्थापक राजाराम काळे, उद्योजिका उज्ज्वला गलांडे, विश्वास वाघमोडे यांना मुंबई भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कर्जत न. प. मुख्याधिकारी रामदास कोकरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता काशिनाथ बेळले, तनुजा वीरकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून समाजाला जोडून ठेवण्याचे कार्य होत आहे. यावेळी संस्थेच्या कार्याचा देखील गौरव मान्यवरांनी केला.
सदर कार्यक्रमास महापौर जयवंत सुतार, उपजिल्हाधिकारी डॉ. धनंजय सावळकर, महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. जगन्नाथ वीरकर, गायक नंदेश उमप, उपअधीक्षक रुक्मिणी गलांडे, नगरसेविका महानवर, लहुजी शेवाळे, अनिल राऊत, ज्ञानेश्वर परदेशी, राजू जांगळे, अहिल्यादेवी मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुण गावडे, डॉ. केशव काळे, डॉ. वर्षा चौरे व गाथा ढाले आदि उपस्थित होते.