शौचालय अनुदान वाटपात भ्रष्टाचार, शेकाप नगरसेवकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:48 PM2019-07-17T23:48:47+5:302019-07-17T23:49:28+5:30
पालिकेच्यामार्फत बांधण्यात आलेल्या ४३४९ खासगी शौचालयाच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बुधवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला.
पनवेल : पालिकेच्यामार्फत बांधण्यात आलेल्या ४३४९ खासगी शौचालयाच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बुधवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पालिकेच्या मार्फत वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांना वीस हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येते. परंतु हे अनुदान वाटप करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. पंचायत समितीमार्फत अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यांचा समावेश महापालिकेच्या लाभार्थी यादीत करण्यात आल्याची बाब नगरसेवक म्हात्रे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनीसुध्दा या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी दिले. त्यासाठी चारही प्रभागात ८0 जणांचे चौकशी पथक तैनात केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
महापालिकेच्या होर्डिंग धोरणावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. या धोरणांअंतर्गत खाजगी इमारतीवर जाहिरात होर्र्डिंग उभारणे खर्चिक होणार आहे. महापालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला ४९ अधिकृत होर्र्डिंग्स आहेत, तर ४0 ते ५0 अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्याची बाब राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. कळंबोलीजवळील खिडूकपाडा गावात देखील कॉलरा, कावीळ, डेंग्यूसारख्या साथीच्या रोगांची साथ पसरली आहे. अपूर्र्ण नालेसफाईमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.
>पालिका बसविणार अत्याधुनिक ५0 टॉयलेट कंटेनर
महापालिका आपल्या कार्यक्षेत्रासाठी नवीन ५0 अत्याधुनिक टॉयलेट कंटेनर खरेदी करणार आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे आदी भागात सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी हे कंटेनर टॉयलेट बसविले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी सभागृहात दिली.
>जिल्हा परिषदेच्या २0 शाळा धोकादायक
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा आहेत. यापैकी २0 शाळांच्या इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या शाळेतून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. महापालिकेने तत्काळ जिल्हा परिषदेला यासंदर्भात सूचना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी केली.