मालमत्ता कर कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा ढोंगीपणा सुरू असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:34 AM2021-04-08T01:34:23+5:302021-04-08T01:34:33+5:30
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना निलंबित करून आपलं तेच खरं करून दाखविण्याचा केविलवाणा प्रकार केल्याचे मत महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी शहरातील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
पनवेल : महाविकास आघाडीचे नगरसेवक जनतेची भूमिका योग्यरीत्या मांडत असताना पनवेल पालिकेच्या महापौरांनी महासभेत अयोग्य निर्णय घेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना निलंबित करून आपलं तेच खरं करून दाखविण्याचा केविलवाणा प्रकार केल्याचे मत महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी शहरातील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना सल्लागार बबन पाटील, शेकाप ज्येष्ठ नेते नारायण घरत, काँग्रेस नेते सुदाम पाटील, शेकाप पमपा जिल्हा चिटणीस गणेश कडू, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी, लोकशाहीच्या नियमांना पायदळी तुडवत प्रशासनाबरोबर नगरसेवकांचे निलंबन केल्याने आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या निष्क्रिय महापौरांचा जाहीर निषेध करतो. मालमत्ता कराबाबत पनवेल पालिकेच्या वतीने झालेल्या महासभेत पनवेल पालिका स्थापनेपासून पुढील पाच वर्षे कोणताही नवीन मालमत्ता कर लागू करू नये, अशी महाविकास आघाडीच्या वतीने प्रमुख मागणी करण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षनेते यांच्यामध्ये गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे महापौरांमार्फत महाविकास आघाडीच्या १५ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. आपले खरे करण्याच्या नादात भाजप उघडे पडल्यामुळे अखेर महाविकास आघाडीचे नगरसेवक कर्नाळा बँकेच्या कुबड्या घेऊन हाणून पडण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र प्रत्यक्षात जनतेला भाजपच्या मनात काय आहे हे कळल्यामुळे आता या सत्ताधाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. सिडकोच्या तुलनेत भाजप स्वार्थी स्वभावामुळे नागरिकांच्या खिशावर डल्ला मारून जास्तीचा कर लागू करतात आणि त्याला महाविकास आघाडीचा कायम विरोध राहणार असून, सत्ताधाऱ्यांना लवकरच फेरविचार करायला लावणार असल्याचा इशारा यावेळी दिला. महाविकास आघाडीचे नगरसेवक जनतेची भूमिका योग्यरीत्या मांडत असताना महापौरांनी अयोग्य निर्णय घेत नगरसेवकांना निलंबित केले असल्याचा आरोप आमदार बाळाराम पाटील यांनी केला. तसेच, कुठलीही सुखसुविधा न देता पालिका मालमत्ता कर लावायला बघते हे अत्यंत चुकीचे असून, याबाबत शासनदरबारी नक्कीच न्याय मागणार असल्याचे आमदार बबन पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीबाबत असलेला राग व्यक्त करण्यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचे नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले.
पीएमसी बँकेतील दहा कोटींचे काय झाले?
कर्नाळा बँकेचा विषय दडपण्यासाठी आम्ही मालमत्ता कराचा विषय लावून धरला असल्याचे आरोप सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून आपल्या घोडचुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार केला आहे. पीएमसी बँकेत पालिकेचे दहा कोटी बुडाले आहेत. त्यावर सत्ताधारी गप्प का, असा प्रश्न आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थित केला.