अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप

By admin | Published: January 5, 2017 06:27 AM2017-01-05T06:27:30+5:302017-01-05T06:27:30+5:30

पोलिसांनी मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उघडकीस आणून त्यामधील करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक सतीश माथूर

Allocating the issue of 25 crores | अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप

अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप

Next

नवी मुंबई : पोलिसांनी मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उघडकीस आणून त्यामधील करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐवज संबंधितांकडे सोपवण्यात आला. त्याकरिता वाशीतील भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मागील काही वर्षांत सराईत गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करून नवी मुंबई पोलिसांनी कार्यक्षमता सिद्ध केली आहे. अशाच गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे चार कोटींचा ऐवज नुकताच पनवेल येथील कार्यक्रमात संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी वाशीत झालेल्या कार्यक्रमात दोन कोटी ३४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल १५४ तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आला. महाराष्ट्र पोलीस स्थापनादिनाच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार मागील काही महिन्यांत उघड झालेल्या गुन्ह्यांमधील जप्त केलेला ऐवज संबंधितांच्या ताब्यात देण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी चोरीला गेलेला मुद्देमाल मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नसल्याचे माथूर यांनी उपस्थितांना सांगितले. गुन्ह्यामध्ये पकडलेल्या आरोपीला शिक्षा झाल्यानंतरच ही प्रक्रिया संपुष्टात येत असून त्यासाठी तक्रारदारांनी न्यायालयात हजर राहून साक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यथा, ऐन वेळी तक्रारदार न्यायालयात गैरहजर राहिल्याने गुन्हेगारांची शिक्षा टळल्याची अनेक प्रकरणे घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर पोलिसांनीही समाजाच्या समाधानासाठी आरोपीला कोठडी होईपर्यंत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. नवी मुंबईची जडणघडण होत असताना, आपणही इथे काम केल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी पनवेल व गडचिरोली या ठिकाणी जाण्याला कोणी अधिकारी तयार नसताना आपण पनवेल निवडले. शहरात तेव्हाच्या व सध्याच्या परिस्थतीमध्ये कमालीचा बदल झालेला आहे. मात्र, सध्या प्रत्येकजण नवी मुंबईतच बदली मागत असल्यामुळे, शहरात असे नेमके काय आहे? हे शोधावे लागणार असल्याचेही त्यांनी विनोदी शैलीतून सांगितले.
या वेळी घडलेल्या गुन्ह्याची उकल करून तक्रारदारांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात पोलिसांपुढे अनेक अडचणी असतात. त्यावर मात करून गुन्हेगारांना अटक केल्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल संबंधितांकडे सोपवण्याचा हा दिवस पोलिसांकरिता आत्मसंतुष्टीचा दिवस असल्याची भावना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केली. गतकाळात सराईत गुन्हेगारांच्या ३ टोळ्यांमधील १७ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, फसवणुकीच्या ९९ तक्रारींमधील ३१ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१६ मध्ये ६० टक्के गुन्हे सिद्ध झाले असून तपासाचे हे प्रमाण सन २०१५च्या तुलनेत अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांची माहिती आॅनलाइन
सराईत गुन्हेगारांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यापासून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टळणार आहे. याकरिता साडेचार हजार गुन्हेगारांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. तर यापुढे अधिकारी बदलला तरी तपासाच्या कामात अडथळा होणार नाही, अशी यंत्रणा तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: Allocating the issue of 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.