नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. विशेषत: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील काही वर्षांत ८७ हजार घरे बांधण्याचे सिडकोचे धोरण आहे. या घरांच्या वाटपासाठी सोडत प्रक्रिया राबविली जाते. मात्र, पुन्हा सोडत काढण्यापेक्षा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर घरांची विक्री करावी. त्यामुळे सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्याचा उद्देश साध्य होईल, अशी सूचना राज्यस्तरीय विकासक संघटनेने सिडकोला केली आहे.
सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी घरांचे वाटप केले जाते; परंतु ज्याला घरांचे वाटप झाले आहे, त्याच्याकडून त्याचा वापर होतो का ? याचा शोध घेण्याची गरज आहे. कारण घरांच्या हस्तांतरणासाठी सिडकोने निर्धारित कालावधी निश्चित केला आहे. हा कालावधी मोठा असल्याने सिडकोने वाटप केलेल्या घराचा वापर दुसरेच कोणी तरी करते. सिडकोच्या गृहप्रकल्पात हा प्रकार सर्रास पाहावयास मिळतो. त्याला आळा घालण्यासाठी घराच्या हस्तांतरणाचा कालावधी कमी करावा, अशी सूचना मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे सचिव प्रकाश बाविस्कर यांनी सिडकोला केली आहे.