लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विमानतळ गाभा क्षेत्रातील ९ गावांमधील प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना धोरणांतर्गत पर्यायी भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे देण्यात येणार आहेत. १५ ते १९ मे दरम्यान यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. उलवे टेकडीची उंची कमी करण्यास सुरवात झाली आहे. या परिसरातील उपरी वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर आता प्रकल्पबाधितांना द्यावयाच्या पर्यायी भूखंडांचे वितरण करण्याविषयीची कार्यवाही सुरू केली जात आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील ९ गावांमधील जमीन अधिसूचित करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रकल्पबाधितांना द्यावयाच्या पर्यायी जागेसंदर्भातील सोडती यापूर्वीच काढण्यात आल्या आहेत. या क्षेत्रातील सर्व प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापन धोरणांतर्गत पर्यायी भूखंडांचे निवाडे तथा वाटपपत्रे वितरित करण्यासाठी १५ मेपासून सुरवात करण्यात येणार आहे. निवाडे वितरण करण्यासाठी पाच दिवसांची विशेष मोहीम आयोजित केली आहे. मेट्रो सेंटर १, सिडको समाज मंदिर सभागृह, दुसरा मजला, सेक्टर १७ नवीन पनवेल येथे हे वितरण केले जाणार आहे. सर्व बांधकामधारकांची यादी, अध्यक्ष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित व पुनर्वसनबाधित दहा गाव संघर्ष समिती व संबंधित ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे दिली आहे. उर्वरित पात्र बांधकामधारकांना देय असलेले निवाडे आदेश टप्प्याटप्प्याने वितरित केले जाणार आहेत. पाच दिवस सकाळी १०.३० ते सायं ४ वाजेच्या दरम्यान हे वाटप केले जाणार आहे.
विमानतळबाधितांना १५ मेपासून वाटपपत्र
By admin | Published: May 13, 2017 1:09 AM