पालिकेतर्फे अंध विद्यार्थ्यांना ब्रेलर मशिनचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:10 PM2018-12-03T23:10:24+5:302018-12-03T23:10:32+5:30
महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ९ अंध मुलांना पालिकेतर्फे ब्रेलर मशिनचे वाटप करण्यात आले आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ९ अंध मुलांना पालिकेतर्फे ब्रेलर मशिनचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे सदर विद्यार्थ्यांना लिहिणे शिकवले जाणार असल्याने त्यांच्यापुढील शिक्षणाची अडचण दूर होणार आहे. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या वतीने महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाºया ९ अंध मुलांना सी.एस.आर. अंतर्गत ब्रेलर मशिनचे वाटप करण्यात आले. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते स्थायी समिती माजी सभापती शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्यासह विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ब्रेलर मशिनद्वारे अंध विद्यार्थ्यांना सहा डॉट्सद्वारे लिहिणे शिकवले जाणार आहे. त्यामुळे मुलांना स्वयं अध्ययनाच्या दृष्टीने मोठा लाभ होणार असून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यानुसार विद्यार्थी व पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
दिव्यांगांसाठी एकाच छताखाली शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालिकेच्या ईटीसी केंद्रामार्फत होत असतो. त्यानुसार दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या कालावधीत प्रौढ दिव्यांग व्यक्तींमध्ये मतदानाच्या प्रक्रियेबाबत जनजागृती केली जाणार आहे. तर कोपरखैरणेतील रा.फ. नाईक महाविद्यालयात तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या युवक-युवतींनी ईटीसी केंद्राला भेट देवून कामकाजाची माहिती घेतली.