मेगा गृहप्रकल्पातील घरांची मार्चपासून वाटपपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:28 PM2019-02-26T23:28:17+5:302019-02-26T23:28:22+5:30

पणन विभागाची जय्यत तयारी : अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

Allotment of Mega Homeworld house from March | मेगा गृहप्रकल्पातील घरांची मार्चपासून वाटपपत्रे

मेगा गृहप्रकल्पातील घरांची मार्चपासून वाटपपत्रे

Next

नवी मुंबई : गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात सिडकोने जाहीर केलेल्या १५ हजार घरांच्या मेगा गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना घरांची वाटपपत्रे मार्च महिन्यात देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सिडकोच्या पणन विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या यशस्वी अर्जदारांच्या अर्जाच्या छाननीचे काम सुरू आहे. हे काम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याने टप्प्याटप्प्याने घरांची वाटपपत्रे दिली जाणार आहेत.


सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी आॅगस्ट २0१८ मध्ये १४,८३८ घरांच्या मेगा गृहप्रकल्पाची घोषणा केली होती. या गृहयोजनेतील घरांसाठी राज्यभरातून जवळपास दोन लाख ग्राहकांनी अर्ज भरले. प्राप्त झालेल्या पात्र अर्जाची आॅक्टोबर २0१८ मध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली. यात यशस्वी ठरलेल्या ग्राहकांच्या अर्जाची छाननी करण्याचे काम सध्या सुरू आहे. या अर्जाची विविध स्तरावर छाननी केली जात आहे. किरकोळ चुकीमुळे किंवा कागदपत्राअभावी एखाद्या अर्जदाराचे घर रद्द होऊ नये, यादृष्टीने पणन विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. संबंधितांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जात आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे. असे असले तरी अर्जाच्या पडताळणीचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाल्याने मार्चपासून यशस्वी अर्जदारांना प्रत्यक्ष वाटपपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. वाटपपत्रे घेतल्यानंतर घरांची शिल्लक रक्कम सहा समान हप्त्यात भरायची आहे. या योजनेतील घरांचा प्रत्यक्ष ताबा आॅक्टोबर २0२0 पासून दिला जाणार आहे. त्यामुळे अर्जदारांना पैसे भरण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे, असे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मेगा गृहप्रकल्पातील १४,८३८ घरांपैकी ११00 घरांना प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे या शिल्लक घरांसाठी पुन्हा अर्ज मागविण्यात आले होते. या ११00 घरांना तब्बल साठ हजार अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या या अर्जाची १४ फेब्रुवारी २0१९ रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली. आता या अर्जाची सुद्धा पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पणन विभागाची कसरत होताना दिसत आहे.
 

अर्ज पडताळणीचे काम जोखमीचे व व्यापक स्वरूपाचे आहे. हे करीत असताना यशस्वी अर्जदारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये. किरकोळ कागदपत्राअभावी नशिबी आलेले घर त्यांच्या हातातून जाऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. साधारण मार्च महिन्याच्या मध्यापासून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष वाटपपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
- लक्ष्मीकांत डावरे,
व्यवस्थापक, पणन-२ (सिडको)

Web Title: Allotment of Mega Homeworld house from March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.