जप्त केलेल्या मुद्देमालाचे वाटप
By admin | Published: January 6, 2016 01:13 AM2016-01-06T01:13:40+5:302016-01-06T01:13:40+5:30
शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४
नवी मुंबई : शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज परत देण्यात आला. यावेळी चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू खुलले होते.
शहरात गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलीस कौशल्य पणाला लावत आहेत. यानुसार गतकाळात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केलेला आहे. त्यानुसार चोरीला गेलेला हा ऐवज मंगळवारी सानपाडा येथे न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांना परत देण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांच्या स्थापना दिन निमित्ताने साजऱ्या होत असलेल्या सप्ताहांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज ४१ जणांना परत देण्यात आला. त्यामध्ये पोलिसांनी शिताफीने उकल केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांचाही समावेश होता. जिल्हा सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके, अपर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, उपायुक्त सुरेश मेंगडे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे गुन्हेगारही गुन्ह्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करीत असल्याचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके यांनी सांगितले. अशा गुन्हेगारांसोबत दोन हात करण्यासाठी करण्यासाठी पोलीसही झटत असतात. अशावेळी नागरिकांनीही पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना काही नागरिकांनी पोलिसांना सिंघमची उपमा दिली. परंतु चित्रपटामध्ये आणि प्रत्यक्षात पोलिसांचे वास्तव्य भिन्न असल्याचे अपर आयुक्त विजय चव्हाण यांनी सांगितले. सिंघमप्रमाणे काम करणारे आमच्यातही आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हेगारांशी लढताना कायद्याचे बंधन असते. यामुळे चित्रपटातल्या पोलिसांप्रमाणे खऱ्या पोलिसांना वागता येत नसल्याचेही ते म्हणाले. गुन्ह्याचा पोलिसांनी तत्काळ उलगडा करावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु पोलिसांवरच जबाबदारी सोपवण्याऐवजी नागरिकांनीही कर्तव्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे अपर आयुक्त चव्हाण यांनी सांगितले. गुन्हे टाळण्यासाठी पोलिसांनी शहरभर माहिती पत्रके वाटलेली आहेत. घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच सायबर गुन्ह्यांत फसवणूक व इतर गुन्हे टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीची माहिती त्यामध्ये होती. तसेच भाडेकरू, कामगार व सुरक्षारक्षक ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देण्याचेही आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले होते. मात्र पोलीस पत्रके वाटून थकले तरीही स्वत:च्या संपत्तीची काळजी कशी घ्यायची, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यामुळे घडलेल्या गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल साधी कौतुकाची थाप मिळाली तरी पोलीस समाधानी असतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)