अडीच कोटींच्या मुद्देमालाचे वाटप, ८० नागरिकांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:46 AM2020-01-10T00:46:41+5:302020-01-10T00:46:48+5:30
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल गुरुवारी तक्रारदारांना परत करण्यात आला.
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल गुरुवारी तक्रारदारांना परत करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते एकूण दोन कोटी ५० लाख ८७ हजारांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण ८० तक्रारदारांना परत करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या बेलापूर मुख्यालयाच्या आवारात कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २ ते ८ जानेवारी दरम्यान रायझिंग डेनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईत दररोज कुठे ना कुठे चेनस्नॅचिंग, मोबाइल, वाहनचोरीच्या घटना घडत असतात. परिमंडळ एक आणि दोनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील एकूण दोन कोटी ५० लाख ८७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात विविध प्रकारची वाहने, सोन्या-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, तक्रारदार अशोक बडोला यांना त्यांचे चोरीस गेलेले ५९ लाख ५१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने परत करण्यात आले. यांच्यासह एकूण ८० नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. या वेळी पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार पाटील, सुरेश मेंगडे, पंकज डहाने, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.
>पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आज आमचे चोरीला गेलेले सोने परत मिळाल्याने खाकी वर्दीवरील विश्वास आणखी बळावला असून पोलीस आपले काम उत्तम रीत्या पार पडत असल्याचे समाधान आहे.
- दिनकर अहिरे, तक्रारदार
>माझे १२ लाख रुपये किमतीच्या बांधकामासाठी लागणारे मशिन चोरीला गेले होते. त्याचा पोलिसांनी छडा लावला आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.
- नितीन शेळके, कळंबोली