ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: May 7, 2017 06:11 AM2017-05-07T06:11:02+5:302017-05-07T06:11:02+5:30
स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो
मधूकर ठाकूर/ लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून चेन्नईतील अमराठी कामगार भरती करणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत, शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. जसखार गावातील पात्रताधारक प्रकल्पग्रस्तांना मुलाखतीशिवाय नोकऱ्यांमध्ये तत्काळ सामावून न घेतल्यास, जसखार गावाच्या हद्दीत सुरू असलेली सिंगापूर पोर्टची कामे बंद पाडून १५ मेपासून प्रकल्पाच्या कार्यालयासमोरच लाक्षणिक उपोषणाचा इशारा जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने ग्रामस्थांनी दिला आहे.
जेएनपीटीच्या माध्यमातून सर्वात मोठ्या लांबीच्या आणि ५० लाखांपेक्षा अधिक कंटेनर हाताळणी होणाऱ्या भारत मुंबई कंटेनर (सिंगापूर) पोर्ट उभारण्याच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, जसखार गावाच्या हद्दीतून या अत्याधुनिक बंदराचे दोन रस्ते बांधण्याला सुरुवात झाली आहे. या रस्त्यांमुळे जसखार गावातील अनेक घरे संपादन करून पाडावी लागणार आहेत. त्यामुळे सिंगापूर पोर्टने जसखार गावातील प्रकल्पग्रस्त पात्र असलेल्या बेरोजगारांना नोकऱ्या देण्यात याव्यात, या मागणीसाठी मागील महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता. आश्वासनांची पूर्तता न करता, उलट पोर्टचे सीईओ सुरेश अमिरो यांनी पदाचा दुरुपयोग करीत स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डावलून चेन्नई येथील अमराठी कामगारांची भरती केल्याचा आरोप करीत, शनिवारी जसखार गाव संघर्ष समितीच्या वतीने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.