पारंपरिक सुगडी बनविण्यासाठी व्यावसायिकांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:18 AM2021-01-13T02:18:08+5:302021-01-13T02:18:16+5:30
अवकाळी पावसामुळे पारंपरिक कुंभार व्यवसायावर संक्रांत
दासगाव : मकरसंक्रांतीसाठी रायगड जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या कारागिरांची सुगड बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाचे वाढलेले भाव, कारागिरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या यामुळे सुगडालाही पूर्वीप्रमाणे मागणी राहिली नसली तरी परंपरा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुंभार व्यवसायावर अवकाळी पावसाने मात्र संक्रांत आणली आहे.
महाड परिसरामध्ये कुंभार समाज आपला पारंपरिक माती व्यवसाय आजही जपत आहे. वयोवृद्ध कलाकार आपली ही कला जपत उदरनिर्वाह करताना दिसत आहेत. मातीच्या चुली, दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, थंड पाण्यासाठी लागणारे माठ व संक्रांतीसाठी लागणारे सुगड बनविण्याचे काम हा समाज सातत्याने करत आहे. काही ठिकाणी मातीचे कोने बनवले जात असतात. परंतु आता बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांशी वस्तूंची मागणी कमी होऊ लागली आहे. अनेक कारागीर माती व्यवसायामध्ये आजही काम करत आहेत. सध्या रायगड जिल्ह्यातील कुंभारवाड्यांमध्ये संक्रांतीसाठी लागणारे सुगड बनवले जात आहेत. लहान सुगड दहा रुपये तर मोठे सुगड वीस रुपयांनी विकले जात आहे.
सुगड बनवण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागत असतो. सध्या महाड तालुक्यात सुमारे पाच हजार सुगडी बनवून विक्रीसाठी तयार झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यामध्ये दोन लाख सुगडींची विक्री होत असे, परंतु आता ही संख्या जेमतेम ६० हजारांपर्यंत पोहोचली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे सुगडीचा वापर आता कमी होऊ लागला आहे. त्यातच सुगड व इतर वस्तू बनवण्यासाठी लागणारी माती, भाजण्यासाठी लागणारा
कोंडा, कोळसा याच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे या व्यवसायावर संक्रांत आली आहे.
मागणीच्या काळात माती भिजली
गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात अवकाळी पाऊस पाडत आहे. यामुळे बनवलेल्या विटा, चुली आणि सुगडी पावसात भिजल्या आहेत. त्यातच यासाठी लागणारी माती आणि भट्ट्यादेखील भिजल्या आहेत. यामुळे मागणीच्या काळातच माती भिजल्याने सुगडी बनवण्यास कालावधी लागणार आहे.
कुंभार समाजावर अवकाळी पावसाने संक्रांत आणली आहे.
कुंभार समाजाला पारंपरिक वस्तू बनवण्याचे आधुनिक प्रशिक्षण मिळावे. तसेच रेल्वे स्थानकामध्ये चहा देण्यासाठी वापरण्यात येणारे कुल्हड राज्यात महाराष्ट्रातील कुंभार समाजाकडून खरेदी केले जावेत. विविध आर्थिक योजना समाजापर्यंत पोहोचव्यात. मातीसाठी लागणारी रॉयल्टी माफ केली जावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- सुभाष शिरशिवकर (कुंभार समाज सल्लागार)
माती, कोळसा, कोंडा हे आता विकत घ्यावे लागते व त्यासोबत मेहनतीचा विचार करता हा व्यवसाय आता परवडत नाही.
- अंजना चांढवेकर, कारागीर