मुरुड : कोकणातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात भात उत्पादन घेत असतात. खूप मेहनत घेऊनसुद्धा भात पिकांमधून मोठा फायदा होत नाही. यासाठीच शेतीबरोबर मत्स्यशेती हा पूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी अवलंबून त्यातील तंत्र जाणून घेऊन आपल्या शेतातसुद्धा मत्स्यशेती विकसित करावी, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन किसान क्रांती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष टी. एस. देशमुख यांनी केले आहे. मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच मत्स्यशेती विकसित करता यावी, यासाठी मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य मुरूड कार्यकारिणी ३५ शेतकऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य पालन, शेत तलाव यांची माहिती व अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. पेण तालुक्यातील सचिन पाटील या मत्स्यपालन करणाऱ्या शेतकरी यांच्या तलावास भेट देण्यात आली. यांच्या तलावामध्ये तिलापिया, रोहु, मिरग अशा अनेक संकरित मत्स्यची सविस्तर व प्रत्यक्ष माहिती त्यांनी शेतकरी मित्रांना दिली. त्यांना मत्स्य शेतीमधून दरवर्षी ६ लाख ते ७ लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोलाड गोवे परिसरातील मत्स्य तज्ज्ञ हसन म्हसलानी येथील मत्स्य बीज केंद्राला भेट दिली. येथे तिलापिया, रोहु, मिरग व शोभिवंत मत्स्य बीजचे पैदास तलाव यांची सविस्तर माहिती हसन म्हसलानी यांनी देऊन सर्व प्रकारच्या संकरित मत्स्य बीज उपलब्ध होतील, असे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या मत्स्य पालनाबद्दलच्या ज्ञानात चांगली भर पडली आहे. येथून या अभ्यास दौऱ्यात स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून मत्स्य शेतीविषयी विशेष माहिती सांगितल्याबद्दल वरील सर्व मार्गदर्शकांना किसान क्रांती संघटनेच्यावतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
या मत्स्य पालन दौऱ्याचे नेतृत्व संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी केले होते. महाराष्ट्र अध्यक्ष टी. एस. देशमुख यांनीसुद्धा बहुमूल्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे. या अभ्यास दौऱ्यात रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनोज कमाने, तालुका उपाध्यक्ष लीलाधर गोंयजी, तालुकाप्रमुख संतोष दांडेकर, संघटक दिलीप विरकुड, गजानन भोईर, अनिल नाकती, शैलेश गुंड, मुशर्रफ खतिब, अमेय वडके असे मुरूड तालुक्यातील एकूण ३५ जणांनी अभ्यास दौऱ्याचा लाभ घेतला आहे.