नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले, गणेशभक्तांची तारांबळ
By नामदेव मोरे | Published: September 7, 2022 06:48 PM2022-09-07T18:48:18+5:302022-09-07T18:48:49+5:30
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल, नवी मुंबई परिसरात सायंकाळी चार नंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची विशेषत: दर्शनासाठी लांगा लावलेल्या गणेशभक्तांची तारांबळ उडाली.
घरगुती गणपती व गौरी विसर्जन झाल्यामुळे नवी मुंबईमधील नागरिक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. वाशी, तुर्भे नेरूळ परिसरामधील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी सायंकाळी चारनंतर अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली. अनेकांनी दर्शन रांगेतून बाहेर पडून आडोषाला जाणे पसंत केले. पनवेल परिसरामध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला होता. मोटारसायकल स्वारांनी उड्डाणपुलाखाली व बसथांब्यावर आडोशासाठी गर्दी केली होती.
पावसामुळे काही ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या असून इतर कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. विजांचा आवाज होत असल्यामुळे व मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विशेषत: वाहन चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.