पुरणपोळीसोबत होळीला चाखा आमरसाचाही गोडवा
By नामदेव मोरे | Published: March 18, 2024 07:46 PM2024-03-18T19:46:49+5:302024-03-18T19:47:07+5:30
४९ हजार पेट्यांची आवक : हापूसचे दरही नियंत्रणात येण्यास सुरुवात.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी ४९ हजार पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १८०० रुपये डझन दराने विकला जात आहे. यापुढे आवक वाढतच राहणार असल्यामुळे होळीला मुंबईकरांना मुबलक प्रमाणात आंब्याची चव चाखता येणार आहे.
प्रत्येक वर्षी गुढी पाडव्यापासून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असते. परंतु यावर्षी होळीलाच मार्केट आंबामय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये कोकणातून ३९ हजार ४२४ व इतर राज्यातून ९५७६ पेट्या अशी एकूण ४९ हजार पेट्यांची आवक झाली आहे. एक आठवड्यापुर्वी आंबा ४०० ते ११०० रुपये डझन दराने बाजार समितीमध्ये विकला जात होता. आता हे दर १०० रुपयांनी घसरून ३०० ते १ हजार रुपयांवर आले आहेत. यापुढे २० एप्रिलपर्यंत आवक वाढतच राहणार आहे. होळीच्या सणाला पोळीसोबत आंबरसाचा आनंद घेता येणार आहे. किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १८०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री हात असली तरी यापुढे हे दरही कमी होण्यास सुरुवात होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडसह कर्नाटक, केरळ व आंधप्रदेशमधूनही आंब्याची आवक सुरू झाली आहे.
बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की यावर्षी मार्च ते २० एप्रिलदरम्यान आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. आंब्याचे दरही नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. हापूसही सामान्याच्या आवाक्यात येणार असून ओळीला सर्वांना हापूसची चव चाखता येणार आहे. मे महिन्यामध्येही आंब्याची आवक चांगली होईल. हापूस बरोबर इतर राज्यातील आंब्याची आवकही वाढण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.