नवी मुंबई : गुन्हेगारांच्या मागे धावणाऱ्या पोलिसांनी शकाऱ्यांसोबत देखील मैदानात धावून एकमेकांवर मात केली आहे. २७ व्या विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धेत पोलिसांची जिंकण्यासाठी चढाओढ सुरु होती. कळंबोली येथील पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात हे सामने रंगले असता त्यातील विजेत्यांना आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
नेहमी गुन्हेगारी घटनांचा तपास, बंदोबस्त, कारवाया यामध्ये गुंतलेल्या पोलिसांना मैदानी खेळात देखील कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी यासाठी प्रतिवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदाची २७ वी विभागीय वर्षी पोलिस क्रीडा स्पर्धा कळंबोली येथील पोलिस मुख्यालयाच्या आवारात झाली. १० सप्टेंबरला सुरु झालेल्या या स्पर्धांची सांगता मंगळवारी १३ सप्टेंबरला करण्यात आली. यामध्ये परिमंडळ १, परिमंडळ २, आयुक्तालय व मुख्यालय असे चार संघ करण्यात आले होते. त्यामध्ये २७ महिला व ९७ पुरुष अशा एकूण १२४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
त्यांच्यात अधिकाऱ्यांसाठी बॅडमिंटन, ७ किलोमीटर चालणे, ५ किलोमीटर चालणे, हॉकी, कबड्डी, हॅण्डबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, खो खो, तसेच हॉलीबॉल आदी स्पर्धा घेण्यात आल्या. वैयक्तिक व सांघिक प्रकारात झालेल्या या स्पर्धांमध्ये पुरुषांमधून मणिलाल गावित व महिलांमधून अर्चना पाटील यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. तर बॅडमिंटनमध्ये निरीक्षक मधुकर भटे यांनी पृथक व आरपीआय शांताराम वाघमोडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ७ किमी चालण्याच्या स्पर्धेत निरीक्षकांना मागे टाकत सहायक आयुक्त डी.डी. टेळे यांनी प्रथम, निरीक्षक राजीव शेजवळ यांनी द्वितीय तर निरीक्षक गिरीधर गोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
५ किमी चालण्यात निरीक्षक जगदीश शेलकर यांनी प्रथम, आरपीआय शांताराम वाघमोडे यांनी द्वितीय तर निरीक्षक अजय भोसले यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्याशिवाय हॉकी, कबड्डी महिला, कबड्डी पुरुष, फुटबॉल तसेच खोखो पुरुष या सामन्यांमध्ये मुख्यालयाच्या संघानी बाजी मारली. तर हॅण्डबॉल व खोखो महिला सामन्यात परिमंडळ १ चे संघ विजयी ठरले. परिमंडळ दोन च्या संघाला केवळ पुरुषांच्या बास्केटबॉल सामन्यात यश मिळाले आहे. तर आयुक्तालयाच्या संघाला महिला बास्केटबॉल व महिला हॉलीबॉल या स्पर्धेत बाजी मारता आली आहे.
या सर्व विजेत्यांना आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सह आयुक्त संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त संजयकुमार पाटील, तिरुपती काकडे, सहायक आयुक्त धरमपाल बनसोडे आदी उपस्थित होते.