नवी मुंबई - तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून यात घसरण झाली असून, आता एक पेटी ६00 ते १५00 रुपयांना विकली जात आहे.एपीएमसीत महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील हापूस येत आहे. महाराष्ट्राच्या विविध विभागांतून मंगळवारी हापूसच्या ७९,८२२ पेट्या दाखल झाल्या, तर इतर राज्यांतून ३४,८६६ पेट्यांची आवक झाली. मागील दोन दिवसांत हापूसची आवक वाढल्याने दरही कमी झाले आहेत. पुढील दोन आठवडे हापूसची आवक स्थिर राहण्याची शक्यता असल्याने दर आणखी कमी होतील, असे व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे यांनी सांगितले, तर मध्यंतरी पावसामुळे हापूस खराब झाल्याने त्याचा फटका विक्रीवर बसला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या ग्राहक कमी असले तरी मागणी कायम असल्याचे फळ व्यापारी जगन्नाथ जगताप यांनी सांगितले.
हापूसची आवक वाढल्याने भाव उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:33 AM