नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरवासीयांवरील मानसिक ताण वाढत आहे. नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मानसोपचार समुपदेशन कक्ष सुरू केला असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.कोरोनाचा संसर्ग मला तर होणार नाही ना? यावर काही उपाय आहे की नाही? हे सर्व कधी थांबणार? अजून किती दिवस वाढणार लॉकडाउन? लॉकडाउन संपल्यावर स्थिती पूर्ववत यायला किती दिवस लागतील? या आणि अशा अनेक प्रश्नांचे ठोस उत्तर कुठूनच मिळत नसल्याने घरी बसलेले नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 'कोविड-१९ मानसोपचार समुपदेशन कक्ष सुरू केला आहे. याकरिता ०२२-३५१५५०१२ हा हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे. यावर संपर्क साधल्यास मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. सध्या केईएम रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डीन आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर तसेच क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सलमा प्रभू यांच्या मुख्य समन्वयाखाली ८ मानसोपचार तज्ज्ञांशी नागरिक संवाद साधत आहेत. ज्या व्यक्ती या काळात क्वारंटाइन आहेत अथवा कोरोना पॉझिटिव्ह आहेत अशा व्यक्तींशीही महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून ते संवाद साधत आहेत. त्यांची विचारपूस करीत आहेत. त्यांच्या मनातल्या भावभावना जाणून घेत समुपदेशन करीत मनोबल वाढवत आहेत. कोरोना प्रसाराची साखळी खंडित करणे व रुग्णसंख्या वाढू न देणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. आणि लॉकडाउनचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ पटवून देत आहेत.>नागरिकांशी संवादप्रत्येक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, सायक्रॅटिस्ट साधारणत: १५ ते २० नागरिकांशी रोज संवाद साधत आहेत. अडचणीच्या काळात मानसिक आधार देत शंकांचे निरसन करण्याची अनमोल संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत समुपदेशन कक्षाच्या समन्वयक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट सलमा प्रभू यांनी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचे आभार मानले.
मानसिक ताणावर समुपदेशनाचा पर्याय, मनोबल वाढविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:13 AM