शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी पातळगंगासह कुंडलीकाचा पर्याय २०५० पर्यंतचे नियोजन सुरू
By नामदेव मोरे | Published: November 10, 2023 04:58 PM2023-11-10T16:58:04+5:302023-11-10T16:58:54+5:30
याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.
नवी मुंबई : शहरवासीयांना २०५० पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा करता यावा यासाठी महानगरपालिकेने तज्ञ समिती गठीत केली आहे. या समितीच्या माध्यमातून पातळगंगासह कुंडलीकामधील पाणीनवी मुंबईसाठी मिळविता येईल का याची चाचपणी केली जात आहे. याविषयी अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे आणण्यासाठीही अभ्यास केला जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापन केलेल्या समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये शहरवासीयांना होणारा पाणी पुरवठा व भविष्यातील गरज यावर चर्चा करण्यात आली. भिरा येथील जलविद्युत प्रकल्पातून कुूंडलीका नदीत सोडण्यात येणारे पाणी शहरांतील नागरिकांसाठी वापरात आणण्यासाठी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून संयुक्त प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यावर चर्चा करण्यात आली. पातळगंगा नदीमध्ये टाटा पॉवरच्यावतीने वीजनिर्मीती केल्यानंतर सोडून देण्यात येणाऱ्या पाण्यामधून १०० दशलक्ष पाणी खोपोली येथून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठविण्याविषयी पर्यायाचाही विचार करण्यात आला. पातळगंगा नदीतील उपलब्ध पाण्यासाठी इतर संस्थांनी आरक्षण केले नसेल तर मनपाच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय कुंडलिका नदीवरून पर्यायी शाश्वत स्त्रोताबाबत प्राथमिक अहवाल तयार करण्यात येणार आहे.
या बैठकीला आयुक्त राजेश नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मनोज पाटील, व्हीजेटीआय मुंबईचे निवृत्त प्राध्यापक डॉ. पी पी भावे , आयआयटीचे ज्योती प्रकाश, मिलींद केळकर, माजी शहर अभियंता मोहन डगावकर, अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, सु श वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
पाण्याचा अनाठायी वापर होऊ नये
नवी मुंबईमध्ये इतर शहरांच्या तुलनेमध्ये प्रतीमाणसी अधिक पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्याचा अनाठायी वापर होण्याची शक्यता आहे. याकडेही लक्ष देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. भविष्यात ठाणे जिल्ह्यातील १४ गावे महानगरपालिकेत सहभागी झाल्यास त्यांना कराव्या लागणाऱ्या पाणी पुरवठ्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला.