नवी मुंबई: ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोर अपघातांचे प्रमाण वाढले होते. या परिसरातील एमआयडीसीसह तुर्भे स्टोअर, तुर्भे नाका परिसरातील स्थानिक रहिवासी, एमआयडीसीत जाणारे कामगार यांची मोठी वर्दळ असते. यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होऊन अनेकदा काही जण दगावले आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिकेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथे उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. वारंवारच्या निविदा प्रक्रियांनंतर अखेर एप्रिल २०२२ मध्ये ठेकेदारास कार्यादेश दिले. परंतु, यास आज एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही. यामुळे स्थानिकांत प्रचंड असंतोष आहे.
नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळविण्यास असमर्थता दर्शविल्याने हे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्भे स्टोअर पुलासाठी ३० कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या कंत्राट दिलेले ठेकेदार मे. महावीर इन्फ्रा या कंपनीस कामासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्याची मुदत २५ ऑक्टोबर २०२३ रोजी संपत आहे. आता अवघे तीन महिनेच शिल्लक आहेत. हे तीन महिनेही पावसाळ्याचे आहेत.
खर्च वाढल्याने काम रखडण्याची भीतीआता महापालिका वाहतूक पोलिसांकडून कधी परवानगी घेणार अन् ठेकेदार ते कधी पूर्ण करणार. शिवाय पुलाच्या कामास उशीर झाल्याने त्याचा खर्चही वाढला आहे. यामुळे कंत्राट दिलेले ठेकेदार मे. महावीर इन्फ्रा कंपनी एप्रिल २०२२ मध्ये दिलेल्या रकमेत हे काम करेल की महापालिकेकडे वाढीव खर्च मागेल, याबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. शिवाय खर्च आयुक्तांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्यास त्यास स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेची परवानगी लागेल. यामुळे हा पूल आणखी रखडणार असेच दिसत आहे.