सत्तेसाठी युती झाली असली तरी सेना-भाजपात कुरघोड्या सुरुच!
By admin | Published: November 30, 2015 02:17 AM2015-11-30T02:17:57+5:302015-11-30T02:17:57+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असला तरी, राज्य पातळीवर त्यांच्यातील दुरावा अद्यापही कमी झालेला नाही
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असला तरी, राज्य पातळीवर त्यांच्यातील दुरावा अद्यापही कमी झालेला नाही. ठाणे, भिवंडी आदी ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमांना भाजपाने हायजॅक केल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी या कार्यक्रमांना दांडी मारली. परंतु आता या दोन्ही पक्षांमधील दुरावा आणखीनच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात कल्याण डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यातही शिवसेनेला आपली ताकद दाखवून देण्याकरिता भाजपाने एकला चलो रे चा नारा दिला आहे. एकूणच शिवसेना भाजपामधील ही खडाखडी आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत वाढणार व परस्परांमध्ये दुरावा निर्माण करणारी ठरणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी करून लढली. परंतु शिवसेना, भाजपाने येथे वेगळी चूल मांडून निवडणूक लढविली. निवडणुकीचा प्रचार शिगेला गेल्यानंतर शिवसेना भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या. परिणामी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. या निवडणुकीत भाजपा ३५ जागांपर्यंत मजल मारेल अशी आशा होती. परंतु त्यांनी थेट ४२ जागांवर मजल मारली. त्यामुळे शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले. अखेरच्या क्षणी समझोता झाला आणि शिवसेना, भाजपा सत्तेत एकत्र आले. परंतु त्यांच्यातील दुरावा आजही कायम आहे.
कल्याण-डोंबिवलीत केवळ सत्तेसाठी समझोता झाला आहे. युतीमधील दुरावा एक्स्प्रेस आगामी काळात धावणार असल्याचे ठाण्यातील शिवसेना आणि भाजपाचे नेते खासगीत सांगत आहेत. कल्याण डोंबिवलीचा स्वबळाचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याने, ठाण्यातही भाजपा त्या फॉर्म्युल्यावर ठाम असून एकत्र लढलो तर उपमहापौर, स्थायी आणि इतर काही समित्या मिळतील. परंतु आपली ताकद किती आहे ते सिध्द होणार नसल्याने हा दुरावा असाच कायम राहावा म्हणून, भाजपाने आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपाला आपल्या राजकीय फायद्याकरिता शिवसेनेशी फटकून वागायचे असले तरी काही स्थानिक नेते तसे होऊ नये याकरिता प्रयत्नशील आहेत. मात्र ठाण्यातील निवडणुकीत वेगळी चूल मांडून जमल्यास एकहाती सत्ता अथवा, अर्धाकाळ सत्ता मिळवायची अशी गणिते भाजपाकडून पक्की केली जात आहेत. भाजपाला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आपली शक्ती अजमावून पाहायची आहे तर शिवसेना आपल्याला भाजपा या जुन्या मित्राकडून वरचेवर दगाफटका केला जात असल्याचे दाखवून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.