कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली तरी धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:44 AM2021-02-12T01:44:29+5:302021-02-12T01:44:44+5:30

१६५ आयसीयूमध्ये : ३९२ जणांना ऑक्सिजनचा पुरवठा, ६० कोरोनाबाधित व्हेंटिलेटर्सवर

Although the number of corona patients has decreased, the risk remains | कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली तरी धोका कायम

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली तरी धोका कायम

Next

नवी मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरातील १६५ रुग्ण आयसीयूमध्ये असून ३९२ जणांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. तब्बल ६० जण व्हेंटिलेटर्सवर आहेत. यामुळे रुग्ण संख्या कमी झाली असली तरी धोका अद्याप संपलेला नसून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. 

नवी मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोरोनामुक्त झाला आहे. इतर विभागामधील रुग्ण संख्याही कमी होऊ लागली आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नागरिकांमधील उदासीनताही वाढत आहे. 

नागरिकांकडून सुरक्षेसाठीच्या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई बाजार समिती, रेल्वे, बस व इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणीही मास्कचा वापर केला जात नाही. वारंवार हात धुण्याच्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. लक्षणे दिसल्यानंतरही अनेक जण चाचणी करीत नाहीत. यामुळे वेेळेत कोरोनाचे निदान होत नाही. उशिरा चाचणी केल्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व आयसीयूमधील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून ७९९ रुग्ण उपचार घेत आहेत. यामधील ७६ टक्के रुग्ण आयसीयू, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन विभागात उपचार घेत आहेत. जनरल वॉर्डमध्ये फक्त १८२ जण उपचार घेत आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, संपलेला नाही. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. पूर्वीप्रमाणे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास कोरोनासह साथीचे अजारही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जोपर्यंत संपूर्ण नवी मुंबई कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत अवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे.

फेब्रुवारीमध्ये ६४५ रुग्ण 
शहरामध्ये फेब्रुवारी महिन्यातील १० दिवसांत ६४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १० फेब्रुवारीला ८४ व ३ फेब्रुवारीला सर्वाधिक ८९ जणांना लागण झाली होती. २ फेब्रुवारीला सर्वांत कमी ३७ जणांना लागण झाली होती. नागरिकांनी योग्य पद्धतीने सहकार्य केले व नियमांचे पालन केले तर रुग्ण संख्या कमी करणे शक्य होणार आहे. अन्यथा कोरोनामुक्त शहर करण्यास अजून काही महिने वेळ लागण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय रुग्ण  
विभाग           रुग्ण 
बेलापूर     १३०
नेरूळ            ११७
ऐरोली           ११९
वाशी             १०८
तुर्भे               ९७
कोपरखैरणे     १४८
घणसोली       ८९
दिघा             १७

Web Title: Although the number of corona patients has decreased, the risk remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.