लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: पनवेल तालुक्यातील नैना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असो किंवा विरार-अलिबाग कॉरीडोर प्रकल्पाचा प्रश्न असो स्थानिक भूमीपुत्रांच्या पाठीशी महाविकास आघाडी सत्तेत असताना सुद्धा होती व आता पण आहे. वेळप्रसंगी या सरकारविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन येथील भूमीपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देवू पण योग्य मोबदला सरकारने या भूमीपुत्रांना दिल्याशिवाय आम्ही एक इंच जमिन सुद्धा या सरकारच्या घश्यात घालून देणार नाही, असा निर्धार दि.29 रोजी पनवेल येथे नैना प्रकल्पग्रस्त समितीच्या व विरार-अलिबाग कॉरिडोर समितीच्या बैठकी दरम्यान महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीत केला.
या बैठकीला महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे पनवेल-उरणचे अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, मा.आ.बाळाराम पाटील, मा.आ.मनोहर भोईर, प्रांताधिकारी राहूल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे, काँग्रेस पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, यांच्यासह ग्रामस्थ व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.