कळंबोली - पनवेलप्रमाणे कळंबोली वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे, म्हणून सिडकोकडे वारंवार मागणी होत होती. त्यानुसार सिडकोने सहा कोटी रुपये खर्च करून ही इमारत गतवर्षापासून उभारण्यास सुरु वात केली. त्यानुसार या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पनवेलप्रमाणे कळंबोलीमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन सेक्टर ९-ई येथे भूखंड क्र माक-९ वर आंबेडकर भवन उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला. गतवर्षी निविदा प्रसिद्ध करून के. डी. कन्स्ट्रक्शद्वारे कामाला सुरुवात करण्यात आली. या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, जून महिन्यात अनुयायांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे. ११८५ चौरस मीटरवर ही इमारत उभारण्यात आली आहे.या ठिकाणी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच कलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे.
आंबेडकर भवनाचे काम अंतिम टप्प्यात, जूनमध्ये होणार लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:30 AM