आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:14 AM2018-08-31T04:14:40+5:302018-08-31T04:15:25+5:30

गोरेगाव पोलिसांची कार्यवाही : वाळू व्यावसायिकांना नोटीस; वेग ताशी २० किमी तर वजन २० टन अपेक्षित

Amber pool closed for heavy traffic | आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

Next

सिकंदर अनवारे

दासगाव : रायगड जिल्ह्यातील महाड आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत, टोल आणि दादली हे तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक स्थितीत असल्याने जाहीर केले होते. मात्र त्यानंतर देखील अवजड वाहतूक सुरूच राहिल्याने गोरेगाव पोलिसांनी आंबेत पुलावरील अवजड वाहतूक गेली दोन दिवसापासून बंद केली आहे. परिसरातील वाळू व्यावसायिकांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

दादली, आंबेत आणि टोल हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे पूल आहेत. या तिन्ही पुलामुळे दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क महामार्गाला जोडला गेला आहे. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या काळात हे तिन्ही पूल पूर्ण झाले आहेत. या पुलाची डागडुजी न झाल्याने हे तिन्ही पूल सध्या धोकादायक स्थितीत आहेत असा निष्कर्ष अधीक्षक अभियंता पूल विभाग यांनी काढला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम महाड यांनी या तिन्ही पुलावरील वाहतूक ताशी २० किमी आणि २० टन क्षमता ठेवण्यात आली आहे. पूल कमकुवत असल्याचा फलक देखील या तिन्ही पुलावर लावण्यात आला आहे. या पुलावर वाहतूक सुरूच राहिल्याने अखेर गोरेगाव पोलिसांनी अवजड वाहतुकीस बंदी घातली आहे.

आंबेत पूल हा गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. रात्रंदिवस या पुलावर होत असलेल्या वाहनचालकांना या चौकीसमोर माहिती घेऊनच पुढे जावे लागत आहे. हा पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या तिन्ही पुलावरून वाळू वाहतूक होत असते. सद्यस्थिती लक्षात घेऊन गोरेगाव पोलिसांनी ठोस निर्णय घेत अवजड वाहतूक बंद केली आहे. त्याच बरोबर कारवाई म्हणून आंबेत परिसरात असलेल्या वाळू व्यावसायिकांना २० टनापेक्षा अधिक वाहतूक करू नये तसेच पुलाच्या १०० मीटरच्या परिसरात कोणतेही वाळू उत्खनन करू नये अशी नोटीस देण्यात आली आहे.
गोरेगाव पोलिसांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद असून आजही महाड आणि टोल पुलावरून वाळू वाहतूक सुरूच आहे. गोरेगाव पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे महाड पोलीस कार्यवाही करतील का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तिन्ही पूल कमकुवत असल्याने त्याची दुरुस्ती करून तात्पुरता वापर करणे किंवा हे पूल पुन्हा नव्याने बांधणे गरजेचे आहे. तात्पुरती दुरुस्ती करून अवजड वाहतूक करण्याची क्षमता वाढणार नाही अशा स्थितीत काही दिवसातच सावित्री खाडीचा हातपाटी आणि ड्रेजरचा लिलाव होणार आहे.सध्याची कारवाई जी गोरेगाव पोलीस करत आहेत तीच कारवाई ठेका दिल्यानंतर याठिकाणी गोरेगाव पोलीस कायम ठेवतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आंबेत पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आल्याने या पुलावरून २० टनापेक्षा अधिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय या परिसरातील वाळू व्यावसायिकांना देखील तशा सूचना करण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- आर.आर.पवार,
पोलीस नाईक
 

Web Title: Amber pool closed for heavy traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.