अंबरनाथ पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By पंकज पाटील | Published: May 30, 2023 07:02 PM2023-05-30T19:02:28+5:302023-05-30T19:02:48+5:30
अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माजी उपनगराध्यक्षाने केलेले अनधिकृत बांधकाम पालिकेने जमीनदोस्त केले.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माजी उपनगराध्यक्षाने केलेले अनधिकृत बांधकाम पालिकेने जमीनदोस्त केले. सुनील वाघमारे असे माजी उपनागराध्यक्षाचे नाव असून त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे पंप हाऊस बळकावून ते १५ वर्षांपासून चक्क भाड्याने दिले होते. अंबरनाथच्या बी केबीन परिसरात पाणीपुरवठा विभागाचे पंप हाऊस होते. हे पंप हाऊस बंद पडल्यानंतर शिवसेनेच्या एका माजी उपनगराध्यक्ष यांनी ते बळकावत १५ वर्षांपासून एका भंगार विक्रेत्याला भाड्याने दिले होते.
तसेच त्याच्या बाजूलाच एक गाळा बांधत तो गॅरेजला भाड्याने दिला होता. या गाळ्यांच्या आजूबाजूला काही टपऱ्या देखील सुरू करण्यात आल्या होत्या. याबाबत अंबरनाथ पालिकेकडे स्वतः पाणीपुरवठा विभागाने तक्रार दिल्यानंतर पालिकेने ऍक्शन मोडमध्ये येत हे दोन्ही गाळे आणि आजूबाजूच्या टपऱ्यांवर बुलडोझर चालवला. या कारवाईनंतर अतिक्रमण करणारे माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्यावर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही होऊ लागली आहे.