अंबरनाथचे ‘नेहरू’ ३७ वर्षांपासून प्रतीक्षेत
By admin | Published: November 14, 2015 11:53 PM2015-11-14T23:53:29+5:302015-11-14T23:53:29+5:30
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शनिवारी अंबरनाथमध्ये साजरी करण्यात आली. मात्र, ज्या उद्यानात नेहरूंचा पुतळा बसविण्यात आला आहे
अंबरनाथ : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शनिवारी अंबरनाथमध्ये साजरी करण्यात आली. मात्र, ज्या उद्यानात नेहरूंचा पुतळा बसविण्यात आला आहे, त्या पुतळ्याचे अनावरण अद्याप केलेले नाही. तब्बल ३७ वर्षांपासून तो अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे.
१९७८ मध्ये तत्कालीन काँग्रेसचे नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांच्या कार्यकालात अंबरनाथ पूर्व भागात एका उद्यानात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, अनावरण करण्यास विलंब झाल्याने तो तसाच उद्यानात उभा राहिला. अनावरण झालेले नसले तरी त्या उद्यानाला मात्र नेहरूंचे नाव पडले. आज-उद्या करीत तब्बल ३७ वर्षे झाली तरी त्याचे रीतसर अनावरण झालेले नाही. नेहरू जयंतीच्या दिवशी काँग्रेसचे कार्यकर्ते या उद्यानात जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित येतात. पुतळ्याचे अनावरण पालिकेने केले नाही, याची खंत व्यक्त करतात. आता या पुतळ्याकडेही दुर्लक्ष आहे. त्याला हार घालण्यासाठी उभारलेल्या पायऱ्या पूर्णत: खचल्या असून त्या कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर पुतळा ज्या चौथऱ्यावर उभा आहे, तोदेखील ढासळण्याच्या स्थितीत आहे.