नवी मुंबई - एका फेरीवाल्याकडून दुसऱ्या फेरीवाल्याच्या मालाची चोरी होताना फोटो काढल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या केल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बाहेरच हा थरारक प्रकार घडला. या घटनेवरून पुन्हा एकदा नेरुळ परिसरातील फेरीवाल्यांची गुंडगिरी उघड झाली आहे.
नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाबाहेर रविवारी रात्री ही घटना घडली आहे. पदपथावर भुर्जीपाव, नारळपाणी तसेच इतर फेरीवाल्यांच्या गाड्या लागत असतात. त्याच परिसरात खासगी रुग्णवाहिकादेखील उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रुग्णवाहिकांचे चालक परिसरात बसून असतात. स्पंदन कार्डिक रुग्णवाहिकेचा चालक युवराज सिंह (३०) याने काही दिवसांपूर्वी तिथल्या फेरीवाल्यांच्या चोरीचे फोटो काढले होते. परिसरात भुर्जीपाव, वडापाव विकणाऱ्याने व मित्राने मनोज साबणे याच्या टेम्पोतून नारळ चोरले होते.
फेरीवाल्यांची गुंडगिरीयुवराज याला रविवारी रात्री एकाने फोन करून भेटीसाठी बोलवले होते. त्यानुसार सहकारी ज्ञानेश्वर नाकाडे याच्या रुग्णवाहिकेतून युवराज हा डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे चालला होता. त्यांची रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात पोहोचताच दबा धरून बसलेल्या चौघांनी युवराज याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच रुग्णवाहिकेवरही त्यांनी हल्ला केला. त्यामुळे ज्ञानेश्वर याने तेथून पळ काढून स्वतःचा जीव वाचवला. युवराज याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी चौघांवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.