चोरी पकडल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या; फेरीवाल्यांची दहशत
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 27, 2023 05:35 PM2023-11-27T17:35:05+5:302023-11-27T17:35:56+5:30
नेरूळमध्ये रुग्णालयाबाहेरच भररस्त्यात थरार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एका फेरीवाल्याकडून दुसऱ्या फेरीवाल्याच्या मालाची चोरी होताना फोटो काढल्याने रुग्णवाहिका चालकाची हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बाहेरच हा थरारक प्रकार घडला. या घटनेवरून पुन्हा एकदा नेरुळ परिसरातली फेरीवाल्यांची गुंडगिरी उघड झाली आहे.
नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाबाहेर रविवारी रात्री हि घटना घडली आहे. रुग्णालयाबाहेर पदपथावर भुर्जी पाव, नारळपाणी तसेच इतर फेरीवाल्यांच्या गाड्या लागत असतात. त्याच परिसरात खासगी रुग्णवाहिका देखील उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रुग्णवाहिकांचे चालक परिसरात बसून असतात. स्पंदन कार्डिक रुग्णवाहिकेचा चालक युवराज सिंह (३०) याने काही दिवसांपूर्वी तिथल्या फेरीवाल्यांच्या चोरीचे फोटो काढले होते. परिसरात भुर्जी पाव व वडापाव विकणाऱ्याने व त्याच्या मित्राने मनोज साबणे याच्या टेम्पोतून नारळ चोरले होते. हा प्रकार युवराज याने फोटोसह मनोज याला सांगितला होता. त्यावरून काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरु होता. रविवारी रात्री एकाने युवराज याला फोन करून भेटीसाठी रुग्णालयाबाहेर बोलवले होते. त्यानुसार सहकारी ज्ञानेश्वर नाकाडे याच्या रुग्णवाहिकेतून युवराज हा डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे चालला होता. त्यांची रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात पोहचताच दबा धरून बसलेल्या चौघांनी युवराज याच्याव जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये काहींनी काचेचे भांडे डोक्यात मारले तर एकाने गळ्यात चाकू भोसकला. तर रुग्णवाहिकेवर देखील त्यांनी हल्ला केल्याने ज्ञानेश्वर याने तिथून पळ काढून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल होताच युवराज याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी चौघांवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याद्वारे इतरही तिघांना अटक केली जाईल असा विश्वास नेरुळ पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेवरून नेरुळ परिसरातली अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
रुग्णालयाबाहेरच घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. तर गुन्हेगारांवर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने त्यांची गुंडगिरी वाढली आहे. किरकोळ गॅरेज कामगारांवर कारवाईत पुढे असणारे पोलिस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहे. त्यामुळे पोलिसांवर देखील गुन्हेगारांची दहशत आहे का ? अशीही शक्यता वर्तवली जात आहे.