रुग्णवाहिका नावापुरत्याच!

By Admin | Published: August 6, 2015 11:45 PM2015-08-06T23:45:18+5:302015-08-06T23:45:18+5:30

मोफत अंत्यसंस्कार करणारी नवी मुंबई महानगरपालिका अपघातग्रस्त व इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यास टाळाटाळ करत आहे. पालिकेची

Ambulance Names Only! | रुग्णवाहिका नावापुरत्याच!

रुग्णवाहिका नावापुरत्याच!

googlenewsNext

नामदेव मोरे ,  नवी मुंबई
मोफत अंत्यसंस्कार करणारी नवी मुंबई महानगरपालिका अपघातग्रस्त व इतर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यास टाळाटाळ करत आहे. पालिकेची सुविधा नसल्याने नाइलाजाने खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. पालिकेची अत्याधुनिक फ्लोटिंग अ‍ॅडव्हान्स कॅज्युलिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच ‘फॅक’ वाहनेही एक वर्षापासून धूळखात पडून आहेत.
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेविषयी
नागरिकांमध्ये असंतोष आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोफत अंत्यविधी करणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे, मात्र व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक सुविधा दिल्या जात नाहीत. नवी मुंबईमध्ये सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड, पामबीच रोडवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातग्रस्तांना महापालिकेची रुग्णवाहिका मिळत नाही. पालिकेत फोन केल्यास, ‘आम्ही रुग्णवाहिका देत नाही. आमच्या रुग्णालयातून रुग्ण इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठीच त्याचा वापर केला जातो,’ असे सांगितले जाते. महापालिकेच्या २० रुग्णवाहिका आहेत. यामधील ७ रुग्णवाहिका भंगारात गेल्या आहेत. उर्वरित १३पैकी
५ वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय व ५ माताबाल रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. एका रुग्णवाहिकेमध्ये फिरता दवाखाना असून २ रुग्णवाहिका बिघडल्या आहेत. पालिका रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका उभ्या असल्या तरी विविध कारणांनी सेवा नाकारली जाते. त्यामुळे नाइलाजाने खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. नवी मुंबई नगरपालिकेने अपघात झाल्यानंतर रुग्णांना तत्काळ उपचार देण्यासाठी गतवर्षी दोन अत्याधुनिक फॅक व्हॅन खरेदी केल्या.
लोकप्रतिनिधींचा आधार : शहरात नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. विजय माने, सोमनाथ वास्कर, दिलीप आमले व इतर अनेक जण तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देतात. शुक्रवारी एका अपघातानंतर मध्यरात्री २ वाजता रुग्णास
डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयामधून वाशीतील एमजीएम रुग्णालयात तत्काळ हलविणे आवश्यक होते. तेव्हा नेरूळचे नगरसेवक सूरज पाटील यांनी रुग्णवाहिका देण्याची तयारी दर्शवून रुग्णाचा जीव वाचविला. अशा लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता खासगी रुग्णवाहिका गरज पाहून नागरिकांकडून जादा पैसेच उकळण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
सरकारच्या रुग्णवाहिकेचीही दिरंगाई
केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. १०८ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून रुग्णवाहिका कुठेही बोलविता येते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरच सरकारची रुग्णवाहिका
२४ तास उभी असते. परंतु दोन दिवसांपूर्वी पदपथावर महिलेची प्रसूती झाल्यानंतर या रुग्णवाहिकेसाठी चालकच नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे ही सुविधाही वेळेत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Ambulance Names Only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.