नवी मुंबई : गणेश उत्सव महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सण. मराठी माणूस जगाच्या कानाकोपºयात कुठेही गेला, तरी गणरायाची प्रतिष्ठापना करतोच. अमेरिकेमधील न्यूयॉर्कची राजधानी असलेल्या आल्बनीमध्येही महाराष्ट्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन केले आहे. ढोल-ताशांचा गजर व लेझीम पथकाच्या साथीने लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढून हिंदू मंदिरांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार नागरिक नोकरी-व्यवसायासाठी आल्बनीमध्ये स्थायिक आहेत. आल्बनी महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून येथील हिंदू मंदिरांमध्ये प्रत्येक सण व उत्सव उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आपले उत्सव व परंपरा टिकविण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न सुरू असून, याचाच भाग म्हणून यावर्षीही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ढोल-ताशांच्या गजरामध्ये व लेझीम पथकाच्या साथीने बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर विधिवत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवासाठी मुंबईवरून मूर्ती मागविण्यात आली आहे. या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या वाशी नवी मुंबईमधील उज्ज्वला विलास ढोले यांनी तेथील उत्सवाविषयी माहिती ‘लोकमत’ला दिली. अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रवासीयांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. मुंबईमधील सार्वजनिक गणेश उत्सवाएवढी भव्य मूर्ती व देखावे नसले तरी त्याच श्रद्धेने व भक्तिभावाने गणरायाची आराधना केली जात आहे. हिंदू टेंपल परिसरातील वातावरणही पूर्णपणे गणेशमय झाले आहे.अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलेले व डिजिटल युगात वावरणारी लहान मुले भगवे ध्वज हातामध्ये घेऊन ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करतानाचे चित्र हिंदू टेंपल परिसरामध्ये दिसू लागले आहे. लहान मुलांनाही यानिमित्ताने सण, उत्सवांचे महत्त्व पटवून दिले जात असून, या माध्यमातून मायभूमीपासून दूर आलेल्या नागरिकांमध्ये भाविक ऋणानुबंध निर्माण करण्यात यश येत असल्याची माहिती उत्सवामध्ये सहभागी ढोले कुटुंबीयांनी दिली.
अमेरिकेतही विघ्नहर्त्याचा जागर, सांस्कृतिक सोहळ्यात दोन हजार नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:47 AM