अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिनावासी चाखणार हापूस आंब्याचा गोडवा, चार हजार टनांचे निर्यातीचे उद्दिष्ट
By नामदेव मोरे | Updated: April 1, 2025 10:57 IST2025-04-01T10:57:10+5:302025-04-01T10:57:53+5:30
Mango News: आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिनावासी चाखणार हापूस आंब्याचा गोडवा, चार हजार टनांचे निर्यातीचे उद्दिष्ट
- नामदेव मोरे
नवी मुंबई -आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ३ एप्रिलपासून अमेरिकेला निर्यात सुरू होणार असून ऑस्ट्रेलिया, जपानसह यावर्षीपासून अर्जेंटिनालाही आंबा निर्यात केला जाणार आहे. यावर्षीपासून पणन मंडळ हे गुजरात, कर्नाटक, केरळसह उत्तर प्रदेशमधील निर्यातदारांनाही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
भारतीय आंब्याला जगभरातून मागणी वाढत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियाला निर्यात करताना विकिरण प्रक्रिया व युरोपीयन देशांसह न्यूझीलंडसारख्या देशात आंबा निर्यात करताना व्हीएचटी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने यासाठी नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये जागतिक मानांकनाप्रमाणे आंब्यावर निर्जंतुकीकरण प्रक्रिया केली जात आहे. या वर्षासाठी चार हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
३ एप्रिलला कंटेनर जाणार
अमेरिकन निरीक्षक १ एप्रिलला दाखल होणार असून, आंब्याची डोज मॅपिंग सुरू करणार आहेत. त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर ३ एप्रिलला पहिला कंटेनर पाठविला जाणार आहे. गतवर्षी मलेशियालाही आंबा निर्यात केला होता. यावर्षी मलेशियासोबत अर्जेंटिनाला आंबा निर्यात केला जाणार आहे.
यंदा निर्यातदारांची संख्या जाणार १००वर
पणन मंडळाच्या विकिरण केंद्रातून गतवर्षी जवळपास ७५ निर्यातदारांनी आंबा निर्यात केला होता. यावर्षी ही संख्या १००च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यावर्षी मध्य प्रदेशमधील २, गुजरातमधील ४ व दक्षिणेकडील राज्यांतून ४ निर्यातदारांनी नोंदणी केली आहे. पणन मंडळ आता राज्यातील निर्यातदारांबरोबर देशातील चार राज्यांनाही आंबा निर्यातीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
व्हीएचपी प्रक्रिया करून आंबा निर्यात
आयएफसी-अमेरिका, ऑस्ट्रेलियाला आंबा निर्यात करताना आयएफसी तंत्राद्वारे तीन मिनिटांची व्हॉट वॉटर ट्रीटमेंट व रेडिएशन ट्रीटमेंट केली जाते.
व्हीएचटी प्रक्रिया-युरोपियन व इतर काही देशांसाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. यामध्ये एक तासाची व्हॉट वॉटर ट्रीटमेंट करून आंबा निर्यात केला जाताे. काही देशांसाठी व्हीएचपी प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जातो.
आंबा निर्यातीचा तपशील
देश निर्यात (टन)
जपान ३५.११०
न्यूझीलंड ९९.३३९
दक्षिण कोरिया ४.६९७
युरोपियन देश १२.२५२
अमेरिका १८३
ऑस्ट्रेलिया ४.०५७
आंबा प्रकारानिहाय झालेली निर्यात
प्रकार निर्यात (टन)
हापूस ७०.२५४
केशर १९२.८०३
बेगनपल्ली ४५.९६
तोतापुरी ०.८५७
लंगडा ७.७६२
चौसा ३.४९७
मल्लिका १.४८२
नीलम ०.३४६
हिमायत २.१५
राजापुरी ३.२४८
दशेरी ३.७०७
रसालू ०.२८७
आजपासून डोजमॅपिंग सुरू
अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक भारतात दाखल झाले आहेत. पणन विभागाच्या नवी मुंबई केंद्रात येणार आहेत. याठिकाणी आजपासून ऑडीट व डोजमॅपींगची प्रक्रिया सुरू करणार आहे.